सोलापूरकडे जाणाऱ्या 60 कामगारांच्या बसला अपघात, 15 जण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावर जामगव्हाण पाटीजवळ रायपूर (छत्तीसगड) येथून सोलापूरकडे जाणाऱ्या 60 कामगारांच्या बसचा अपघात झाला. या अपघातात 15 कामगार जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. जखमींना तत्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रायपूर (छत्तीसगड) हून सुमारे 60 कामगार सोलापूरकडे कामाच्या शोधात खासगी बस (क्र. सीजी 08 एएल 6025) ने जात होते. पहाटेच्या सुमारास हिंगोली – नांदेड महामार्गावर जामगव्हाण पाटीजवळ वळण रस्त्यावरून कामगारांची बस पुढे जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने बस पुढे जाऊन उलटली. या अपघातात 60 पैकी 15 कामगार जखमी झाले. पहाटे चालकाला लागलेल्या डुलकीमुळे हा अपघात घडून बस पलटी झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार शेख बाबर, भगवान वडकिले, चालक भारत मुलगीर, गजानन मुटकुळे, डाखोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तत्काळ दोन रुग्ण वाहिका बोलावून बसमधील जखमींना 60 बाहेर काढून 15 जणांना दोन्ही रुग्णवाहिकेतून नांदेडला उपचारासाठी पाठविले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.