सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील चार पोलिस कर्मचारी यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यांच्या संपर्कातील 68 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 48 जणांना विलगीकरण कक्षात तर वीस जणांना होम क्वारंनटाइन करण्यात आले होते. त्यापैकी नऊ जणांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले असून त्याची तपासणी खाजगी लॅब मधून करण्यात आली आहे. आता या नऊ जणांच्या संपर्कातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. तर दुसरीकडे शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या तीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना तातडीने विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्याच संपर्कातील आणखी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज (रविवारी) दिली. तर शहरातील तीन पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.
शहर जिल्ह्यातील नागरिक कोरोनापासून दूर राहावेत, या हेतूने 22 मार्चपासून राज्यातील पोलिस कर्मचारी रात्रंदिवस रस्त्यांवर पहारा देत आहेत. शहर जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन सातत्याने करूनही अनेक शहर जिल्ह्यांमधील नागरिक ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. सोलापूर शहर हद्दीत आठ ठिकाणी तर शहरांतर्गत सात ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. तर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जेणेकरून विनाकारण कोणीही परी जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येणार नाही, अशी खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. तरीही ग्रामीण पोलीस दलातील 13 तर शहर पोलीस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आता समोर आले आहे. त्यांच्या संपर्कातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध तातडीने घेतला जात असून त्यापैकी काहींना वैद्यकीय तपासणीसाठी हलविण्यात आल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
संपर्कातील कर्मचारी व व्यक्तींचा शोध सुरू
शहर पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सुमारे 80 ते 90 जण आल्याचा अंदाज आहे. तर ग्रामीण पोलीस दलातील या नऊ कर्मचाऱ्यांच्या संपर्कात नेमके किती पोलीस अधिकारी व कर्मचारी आले, याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. तत्पूर्वी, ग्रामीण पोलीस दलातील कोरोना पॉझिटिव्ह चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील 68 जणांना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी 48 कर्मचारी आयसोलेशन वॉर्डमध्ये तर 20 कर्मचारी होम क्वारंनटाइन करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, याची खबरदारी म्हणून ग्रामीण पोलीस दलातील 55 वर्षांवरील 14 पोलीस अधिकारी व 138 कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना केल्या आहेत.