कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
भारत- पाकिस्तान मधील 1971 ची लढाई राज्यातील शहरांसह ग्रामीण भागात चित्रण दाखविणार आहोत. 1 आॅक्टोंबर ते 16 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रात सर्व स्तरातील नागरिक व विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न आहे. या तीन महिन्यांच्या काळात प्रदर्शने, व्याख्याने व क्रिडास्पर्धा होणार आहेत. सैनिक यात्रा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.
कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भारत- पाकिस्तान युध्दात विजयाच्या सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासंदर्भात त्यांनी यावेळी माहिती दिली. कराड येथून सुवर्ण महोत्सव कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली. आजी- माजी सैनिक संपर्क अभियान कराड तालुका यांच्यावतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सुधीर सावंत म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. तर भारत- पाकिस्तान मधील 1971 च्या युध्दाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या लोकांना या लढाईचा इतिहास माहिती होण्यासाठी ही सैनिक यात्रा सुरू केलेली आहे. तीन महिन्याच्या काळात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून 16 डिसेंबर रोजी या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.