औरंगाबाद | दि. 23 आई समोर वाईट शब्द वापरल्याने संतापलेल्या तरुणाने मित्राची धारदार चाकूने वार करीत हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री संजयनगर येथील गल्ली क्रमांक 7 मध्ये घडली. भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मंगेश दिनकर मालोदे वय-30 (रा.संजयनगर, गल्ली क्र.7, औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर शेख अरबाज उर्फ विशाल उर्फ भुऱ्या शेख अहेमद वय-24 (रा. गौसिया मस्जिद जवळ, कैलास नगर,औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत मंगेश हा एका कंपनीत कामाला होता. परिसरातच राहणाऱ्या आरोपी भुऱ्या सोबत त्याची मैत्री होती. 21 जुलै रोजी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपी भुऱ्याने गुरुवारी मंगेशच्या घरी जाऊन मंगेश व त्याच्या वडिलांची माफी मागितली होती.त्या नंतर दोघेही पुन्हा पहिल्यासारखे मैत्रीपूर्ण बोलायला लागले होते.दरम्यान गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मंगेश गल्लीच्या चौकातील ओट्यावर बसलेला असताना भुऱ्या त्याच्या आईसह तेथे आला. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाला.या वेळी मंगेशने रागाच्या भरात भुऱ्याला बरेवाईट बोलला.आई समोर मंगेश सुनावत असल्याने भूऱ्याच्या ‘तळ पायाची आग मस्तकात गेली.’ त्याने मागचा पुढचा विचार न करता स्वतः जवळील धारदार चाकू काढला व मंगेशला भोसकले. मंगेश रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्याचे पाहून भुऱ्याने तेथून पळ काढला.मंगेश रक्तबंबाळ अवस्थेत व्हीव्हळत असल्याचे पाहून राहिवश्यनी त्यास रिक्षातुन घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यावर उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याची प्राणज्योत मालवली.या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी गुन्हदाखल करीत आरोपी भुऱ्याला अटक केली.आज सकाळी परिमंडळ -2 चे उपायुक्त दीपक गिर्हे व जिन्सी पोलिसांनी घटनस्थळाची पाहणी केली.
परिसरात भूऱ्याची दहशत
संजयनगर, कैलासनगर, भवानी नगर सह जिन्सी भागात भूऱ्याची दहशत आहे. त्याला गांजा आणि दारू पिण्याची सवय आहे. परिसरात मनाला येईल त्याला तो मारत असे त्रास देत असे या पूर्वी देखील त्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याच्या दहशतीमुळे त्याचा विरोध कुणी करीत नसे. दाहशतीचा फायदा घेत नशेसाठी तो तरुणांकडून पैशे देखील हिसकून घ्यायचा असे रहिवाशी सांगतात.