करमाळा : हॅलो महाराष्ट्र – सासरच्या जाचाला कंटाळून एखाद्या विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याच्या घटना याअगोदर घडल्या आहेत. पण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या ठिकाणी पत्नीनं आणि तिच्या घरच्यांनी छळ केल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या केली आहे. पत्नीला नांदायला न पाठवणे, जमीन नावावर करून देण्यासाठी तगादा लावणे अशा विविध कारणातून मानसिक छळ केल्यानं संबंधित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव अभिजित कांतीलाल घोगरे असे आहे. तो करमाळा तालुक्यातील सरपडोह येथील रहिवासी आहे. मृत अभिजित याचा मागील काही दिवसांपासून विविध कारणांसाठी पत्नी आणि सासरच्या मंडळीकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. मृत अभिजित याची पत्नी काही दिवसांपूर्वी कोणतही कारण नसताना, घर सोडून माहेरी गेली. यानंतर अभिजितनं पत्नीला घरी येण्यासाठी अनेकदा विनवणी केली. पण सासरच्या कुटुंबीयांनी पत्नीला पाठवण्यास नकार दिला.
तसेच त्यांनी जमीन पत्नीच्या नावावर करून देण्याचा तगादा लावला होता. यासाठी तरुणावर मानसिक दबाव टाकण्यात येत होता. एवढंच नव्हे तर, आरोपींनी जावयाकडून बांधकाम करून घेतलं आणि त्याचे पैसेसुद्धा दिले नाहीत. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून अभिजित यानं घरातील लोखंडी नळीला ड्रीपच्या पाईपने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी नातेवाईक आणि कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर पोलसांनी मृताच्या पत्नीसह सासरच्या चार जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.