बिहार निवडणूक 2020 : तेजस्वी यादव होणार का बिहारचे बाहुबली ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार मोदी-नितीशकुमार यांचा पराभव होऊन बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) फार पूर्वीपासूनच तयारी केली होती. निवडणुकीपूर्वीच संयुक्त जनता दल (जदयू) आणि भाजपकडून बिहारच्या विकासाचा डंका पिटायला सुरुवात झाली होती. अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्येनंतर भाजपकडून या मुद्द्याचे राजकीय भांडवल करण्यासाठी पद्धतशीरपणे व्यूहरचना आखण्यात आली होती. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमारांचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा होरा राजकीय तज्ज्ञांकडून बांधला जात होता.

प्रत्यक्षात निवडणूक जवळ आल्यानंतर बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखाली अगदी जागावाटपासून ते पुढील सर्व गोष्टी नियोजनबद्ध रितीने पार पडल्या. अर्थात यासाठी तेजस्वी यादव यांनी अथक मेहनत घेतली. निवडणुकीच्या प्रचारासाठी तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये सर्वाधिक 251 सभा घेतल्या. ही आकडेवारी बरेच काही सांगून जाणारी आहे.

या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मतदारांना वारंवार लालूप्रसाद यादव यांच्या काळातील ‘जंगलराज’ची आठवण करुन देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तेजस्वी यादव यांनी यावर आक्रस्ताळेपणाने प्रतिक्रिया न देता एकएक करुन हा गुंता सोडवला. आपण सत्तेत आल्यास बिहारमध्ये ‘जंगलराज’ची पुनरावृत्ती होणार नाही, हे त्यांनी बिहारच्या मतदारांना सांगितले.

तेजस्वी यादव यांनी विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावर भर दिला. बिहारमध्ये सत्ता आल्यास 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.तेजस्वी यादव यांच्या या घोषणेमुळे ‘जंगलराज’ची भीती आणि भावनिक मुद्द्यांभोवती केंद्रित असलेली भाजपची व्यूहरचना फोल ठरताना दिसली.

या सगळ्यामुळे बिहारमध्ये सत्तापलट होणार, हे जवळपास गृहीत धरले जात आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर ‘एनडीए’ला नमवून तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook