ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा प्रवास..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दुनियादारी | साधारण वीस पंचवीस वर्षापुर्वी किंबहुना त्या ही काही वर्षे आधीपासुन गावाकडुन मुंबईला निघायचं म्हणलं की त्या एरियातल्या ट्रॅव्हल्स किंवा गावातले काही ट्रक लोकांना जाण्यासाठी सोयीस्कर पडायचे.एसटी चा प्रवास महाग म्हणण्यापेक्षा वेळेला उपलब्ध नसल्यानं ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांचा वापर मुंबईला जाण्यासाठी व्हायचा. उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या लागल्या की मुंबईकरांची गावाकडं येण्याची धावपळ सुरु व्हायची. एरवी कमी असणार्या ट्रॅव्हल्स चे रेट सुट्टीच्या काळात डबल व्हायचे. पण तरी ही चाकरमानी त्यात एडजस्ट करुन यायचे. महिना सव्वा महिना सुट्टी काढुन गावाला आल्यावर गावाकडची गार व फ्रेश हवा तेव्हा सुखद वाटायची. तेव्हा मुंबईवरुन आलेल्या त्या कुटुंबाकडंं गावाकडची कुटुंबे हेवा वाटणार्या नजरेने पाहायची. पोशाख, बोलण, लकब, सर्वकाही शहरी असल्यानं या मुंबईकरांची हवा व्हायची. मुलं मुली एंजॉय करायची. मात्र त्यांचे वडील मुंबईवरुन आल्या आल्या दुसर्या दिवशी रानात जायचे. हातात खोर घेऊन नाहीतर खुरपं घेऊन गवत काढं कुठं काहीतरी रानातलं छोटं मोठं काम कर यात व्यग्र रहायचे. यात्रा, पै पाहुणे मित्रपरिवार.. तालुक्याचे,जिल्ह्याचे ठिकाण.. इथे भेटी देऊन आल्या की मुंबईकराला सुख वाटायचं. यात्रा संपल्या. की सुट्ट्या संपायचे वेध लागायचे. हेच चाकरमानी मग पुन्हा परतीच्या प्रवासाच्या तयारीला लागायचे. तेव्हा पुन्हा ट्रॅव्हल्स आणि गावातले मुंबईला जाणारे ट्रक्स हे त्यांची प्रवासाची साधने..मग कुणीतरी आधीच ट्रकवाल्याकडं मुंबईला जाण्यासाठी नंबर लावलेला असायचा. मुंबईला जायचं म्हणुन घरनं गहु,ज्वारी..तांदळाची पोती सोबत असायची. बरं केबिन मधे नाही म्हणलं तरी दोन कुटुंबे असणार.. अधिक त्यांच सगळं हे सामान सोबत असणार..हेच चित्र ट्रॅव्हल्समधेही..

ट्रॅव्ह्ल्स ची डिगी आणि टप तर अशा गहु ज्वारी व बॅगांनी खचाखच भरुन जायची. वर्षातुन दोनदा त्या ट्रॅव्ह्ल्स ला कधी नव्हे ते इतका ओझ्याचा भार झेलावा लागायचा. मुंबईला जाणार म्हणुन दोन तीन दिवस आधी मग ही कुटुंबे सर्व आवरुन तयार रहायची.गाठीभेठी घ्यायची. घरातील वयस्कर माणसांपाशी वेळ घालवायची. अन जाण्याच्या दिवशी ट्रॅव्हल्सची पावती घेऊन किंवा ट्रकवाल्याला सांगुन जागा फिक्सय बर का आमची अस सांगुन आपल्या सीट्स कन्फर्म करायची. ट्रक ची जाण्याची वेळ शक्यतो संध्याकाळी पाच.. अव ट्रॅव्हल्स ची वेळ रात्री 8-9 वाजता.. ही कुटुंबे मग तासभर आधीच सगळं सामान घेऊन टेरॅव्ह्ल्स जिथे थांबते तिथे उभी रहायची. मुंबयवाल्यांना सोडायला आलेली घरातली माणसं..मित्रपरिवार त्यांच्यासाठी आवर्जपन थांबलेले असत.. काळजी करु नका.. मी दिवाळीला येईन..अन नाय सुट्टी मिळाली तर पुढला उन्हाळा आहेच.. मी घेतो काळजी.. तुमी पण घ्या.. गोळ्या व्यवस्थित टायमावर घ्या.. वगैरै काळजीने सगळे एकमेकांशी बोलते व्हायचे..

म्हातारी वयस्कर मंडळी मग यायची. तोपर्यंत ट्रॅव्हल्स लांबुन कुणाला तरी दिसलेली असायची.. इतक्या रात्री भरपुर लाईट असणारी गाडी म्हणजे ट्रॅव्हल्सच असणार याचा अंदाज तंतोतंत खरा असायचा. गाडी आली रे.. असं कुणीतरी म्हणायचं..अन निवांत गप्पात रंगलेली माणसं मग अचानक सगळं सावरुन उभं रहायची. घेतलय का सगळं व्यवस्थित.. काय विसरलं नाय ना.. कपडे बिपडे घितली ना.. पोरांच खेळणं घेतलय का.. इत्यादी इत्यादी बोलणं होईस्तोवर लाईटच्या झगमगाटाने सजलेली एक रंगबेरंगी गाडी समोर येऊन उभी रहायची.. सोबत त्या गाडीत लावलेल्या सुगंधी उदबत्तीच्या वासासोबत..सवयीप्रमाणे मग दहा पंधरा मिनिटे उशिरा आलेल्या त्या ट्रॅव्ह्ल्समधे सामान भरायची लगबग सुरु व्हायची. ट्रॅव्हल्सवाल्याचा एक माणुस अन ज्याचं सामान आहे तो माणुस यांच्यात ते सामान व पोती ठेवण्याची घाई व्हायची. बायका व लहानपोरं आपापल्या सीट तपासत जागेवर जाऊन बसायच्या. तोपर्यंत गडी माणसं पोती बॅगा ठेऊन मोकळे झालेले असायचे. त्यातच मग एखाद्याचं नवीन लग्न झालेले असायच.. बायकोला त्यानं खिडकीजवळ बसवलेलं असायचं..

त्या नवरीने मुंबई कधी पाहिलेली नव्हती म्हणुन त्याने तिला खिडकीजवळ जागा दिली होती. या गडबडीत गाडीचा म्युजिकल हॉर्न वाजतो अन गाडी निघण्याचा टाईम होतो..चला येतो.. चला येते..म्हणत काळजीच्या स्वराने डबडबत्या डोळ्यांनी एकमेकांचे निरोप घेतले जायचे.. लहान मुलांच्या पापे घेतले जायचे.. अन गाडी स्टार्ट झाली की येतो.. येते.. फोन करतो पोचल्यावर.. काळजी करु नका.. म्हणत तोपर्यंत गाडीने पहिला गियर टाकलेला असायचा..गाडी निघाली की सोडायला आलेली माणसांना गहिवरुन यायचं.. दोस्त मंडळीं ही काही क्षण भावुक व्हायची..

तोपर्यंत गाडीतल्या टिव्हीवर मराठी नाहीतर हिंदी चित्रपट लागलेले असायचे.. गाडीतलं पब्लिक मग त्यात रममाण व्हायचं.. अन काही थांबे घेत मग सुसाट वेगाने ती ट्रॅव्हल्स मुंबईच्या दिशेने कुच करायची. लहान पोरं तोपर्यंत झोपलेली असायची..अन नव्या जोडप्यांच्या गुजगोष्टी चालु व्हायच्या. नव्या नवरीला हे बघ हे हे गाव.. हे बघ..हे हे शहर असं सांगताना त्याला ही छान वाटायचं..

लोणावळ्याच्या अलिकड वगैरे गाडी चहाला थांबुन पुन्हा गाडी मुंबईकडं वळायची.. तोपर्यंत कळंबोली पर्यंत गाडी आलेली असायची.. तिथं उतरणारी माणसं उतरायची.. तोपर्यंत पहाटेचे साडेचार वाजलेले असत..सरावाने अनेकांना जाग यायची. अन नजारा पाहुन माणसं ओळखायचे.. वाशी आली..तोपर्यंत इकडे नव्या जोडपं जागं झालेलं असायचं. अन ती नव्या नवरी समोरील बिल्डिंगच्या लाईट्स पाहुन भारावुन गेलेली असायची..ही वाशी.. इथुन मुंबई चालु झाली बघ.. तो म्हणायचा..किती हो ह्या लाईट्स.. कसलं वाटतय ना..मग…

या गप्पात तोपर्यंत गाडी प्रत्येक स्टॉप घेत शेवटच्या स्टॉप ला थांबायची.. सगळे उतरायचे.. अन ओझ्याने दबलेली ती रंगबेरंगी गाडी अखेर एअर टाकुन मोकळी व्हायची. हेच ट्रक बाबतीतही.. मात्र ट्रकात जागा कमी असल्याने त्यात दोन कुटुंबांनाच बसता यायच.. ते ही कसतरी.. त्यात समोर सामान.. गाडी वाशीला थांबणारय बर का.. तितनं लोकल न तुम्ही जावा.. ट्रकवाल्यानं आधीच सांगितलेलं असतं.. किंवा जिथं त्यांना उतरायचय..त्याच्या अलिकडच्या स्टॉपर्यंतच ट्रक असतो. त्यामुळे लोकल ने पुढे जावे लागणार हे त्या कुटुंबांना माहित असायचं.. उदबत्तीच्या वासासोबत, हिंदी मराठी गाण्यांसोबत डुलत, गुणगुणत, ओझ्याने रमत गमत शेवटी तो ट्रक मुंबईला पोहचायचा.. अन बसुन बसुन अवघडलेले कुटुंबिय अखेर आली एकदाची मुंबई म्हणत पटापट आपापल्या बॅग्ज व पोती बाहेर काढायची लगबग करायचे..

विषय खरंतर या कुटुंबांचा नाही. विषय आहे ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा.. ज्यांच आज ही अतुट नातं गावकर्यांशी जोडलं गेलं आहे.. आज काळ बदललाय.. बरीचशी माणसं मुंबईहुन दुसरीकडे शिफ्ट झालीत.. आता बाकी शहरे ही मुंबईला टफ चाललीत. पोषाख, बोलणं..यात आता सगळीकडे आधुनिकपणा आला आहे. या सगळ्या गोष्टीमुळे रोजगाराला मुंबईत जाणारा ओढा आता इतर शहरांकडे कधीचा वळलाय.. पण ट्रक व ट्रॅव्हल्स या दोन गोष्टी मात्र आज ही गावावरुन शहरात किंवा शहराकडुन गावाकडं जाताना त्यात बसलेली माणसं ट्रक ट्रॅव्हल्सच्या खिडकीतुन आज पळती झाडे, माणसं पाहताना आठवणीत रममाण होत त्यांची झोप कधी लागते हे त्यांना देखील समजत नाही..

– विकी पिसाळ
9762511636

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment