भारताला गरज अधिक तपासण्यांची..!! संचारबंदी हा दिलासा देणारा तात्पुरता इलाज – आशिष झा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लढा कोरोनाशी | कोरोना महामारीशी लढण्यासाठी भारताने संचारबंदी लागू करण्याचं पाऊल उचललं. हे पाहून हार्वर्ड जागतिक आरोग्य संस्थेचे प्राध्यापक व्यवस्थापक आशिष झा म्हणाले, आपण जर अचूक ठिकाणी अगोदर पुरेशा चाचण्या केल्या नाहीत, तर यातून बाहेर पडण्यासाठीची कोणतीही रणनीती निष्फळच आहे. हे सांगत असताना त्यांनी असा युक्तिवाद केला की, भारतात सध्या जेवढी कोरोनाग्रस्तांची संख्या आहे, त्यापेक्षा ती निश्चित अधिक आहे. आणि हे केवळ तपासणी करुनच समजू शकतं. लॉकडाऊनमुळे आता तात्पुरता दिलासा मिळेलही पण मे महिन्याच्या मध्यात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक होईल. आणि मेनंतर आणखी ६ आठवडे संचारबंदी करावी लागेल असं आशिष झा यांना वाटतं.

प्रश्न – आपण १ एप्रिलला म्हणाला होता, की युरोप आणि अमेरिकेत कोरोनाची दहशत ३ ते ६ आठवडे अशीच चालू राहील (कोविड -१९ च्या हॉटस्पॉट नुसार) आणि ही केंद्र मुंबई, रिओ दि जेनेरिओ, मोंरोव्हियाकडेही सरकतील. हे खरं ठरतंय. आता भारतासाठी काय संभाव्य पर्याय आहेत? भारत अर्थकारण आणि आरोग्य यामध्ये संतुलन साधू शकेल असं तुम्हाला वाटतंय? 

आशिष झा – अर्थकारण आणि आरोग्य यात एखादी तडजोड आहे का? याबद्दल मला खात्री नाही. जर तुम्ही संपूर्ण भारतातल्या गरीब, आता पैसे न मिळणाऱ्या, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा विचार केला तर त्यांच्यापैकी बरेच जण आरोग्याच्या समस्यांना बळी पडत आहेत. जेव्हा तुम्ही संचारबंदीसारखं काहीतरी करता; जे आरोग्याच्या मुद्द्यांशी निगडित आहे, तेव्हा तुम्ही हेसुद्धा लक्षात घ्यायला हवं की  प्रत्यक्षात संचारबंदीची किंमत ही मोठ्या प्रमाणात आरोग्यावरील परिणामाच्या रूपानेच मोजावी लागते. तुम्ही संचारबंदी मोडून काही काळासाठी गोष्टी खुल्या केल्या तर अर्थकारण मागे जाईल. यामुळे केसेसच्या संख्या एकदम वाढतील आणि दवाखानेसुद्धा खचाखच भरून जातील आणि याचा अर्थकारणावर निश्चितच नकारात्मक परिणाम होईल. भारतातले हजारो लोक रुग्णालयात असतील, तडफडून मरत असतील तर कोण रेस्टारंटस आणि हॉटेलमध्ये जाईल? इथं आपली एक कोंडी आहे. जर तुम्ही आरोग्यावर लक्ष केंद्रित करीत असाल तर केवळ तुमच्या अर्थकारणावर नकारात्मक परिणाम होत नाहीत तर तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतात. जर तुम्ही अर्थकारणावर लक्ष केंद्रित करीत असाल तर त्याचे केवळ आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत नाहीत तर त्याचा शेवट अर्थकारणाचे नुकसान होऊन होतो. आपण यावर तिसरा मार्ग शोधला पाहिजे, ज्यामध्ये अर्थकारणही खुले राहील आणि आरोग्यसुद्धा व्यवस्थित राखलं जाईल. मला वाटतं भारतासारख्या देशात हा तिसरा मार्ग राबवणं थोडं कठीण आहे, पण अशक्य नाही.

प्रश्न – निर्णय घेणारे लोक, कदाचित हळूहळू संभाव्य निर्गमन धोरणांची चर्चा करीत आहेत.(संचारबंदी उठवण्याचा विचार) किंवा पुढे केवळ हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणीच संचारबंदीवर लक्ष केंद्रित करीत आहेत. याबद्दल काय सांगाल?

आशिष झा –  जर तुम्ही म्हणालात केवळ हॉटस्पॉट असणाऱ्या जागांमध्ये संचारबंदी ठेवा तर माझा पहिला प्रश्न आहे, तुम्हांला कसं माहित की कोणती ठिकाणे ही हॉटस्पॉट आहेत? जर एखाद्या ठिकाणी खूप चाचण्या होत नसल्याने फार केसेस मिळत नाहीत तर तुम्ही ते ठिकाण हॉटस्पॉट नाही असं म्हणू शकत नाही. जोपर्यंत भरपूर तपासण्या होत नाहीत तोपर्यंत तुम्ही मला असे सांगू शकत नाही की महाराष्ट्रात, बिहारमध्ये किंवा आणखी कुठे जास्त केसेस आहेत. मला नेमक्या किती तपासण्या होत आहेत हे माहीत असणे गरजेचे आहे. तरच नेमक्या किती केसेस आहेत याचा अंदाज लावता येईल. भारताची पहिली रणनीती ही भरपूर तपासण्या करण्याची असली पाहिजे. मंगळवारपर्यंत भारताने १ लाख तपासण्या केल्या होत्या. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत हे काहीच नाही. भारताने कमीतकमी यापेक्षा दहापट तपासण्या, दरदिवशी करणे गरजेचे आहे. आता ते खूप कठीण आहे. तुम्हाला खाजगी क्षेत्राची भरपाई करावी लागेल, यासाठी खूप काम करावे लागेल. पण जर तुम्ही ते नाही केले तर तुम्हाला कायम संचारबंदीमध्ये राहावे लागेल ही समस्या आहे. संचारबंदी आजारावर उपचार करत नाही ती केवळ त्याचे ओझे थोडे कमी करते. आजार दूर करणारा इलाज म्हणून संचारबंदीकडे पाहताच येणार नाही. या आजाराची सर्वात मोठी समस्या अशी आहे, की तुमच्या आजच्या कोणत्याही क्रियेवरील प्रतिक्रिया येण्यासाठी तुम्हांला पुढच्या तीन आठवड्यांपर्यंत वाट पहावी लागते. मग कल्पना करा १४ एप्रिलला देशाने संचारबंदी संपवण्याचे ठरविले, २१ एप्रिलला सगळे खूप छान दिसेल, २८ एप्रिलला आपण कोरोना विषाणूशी लढलो म्हणून लोक आनंद साजरा करतील, पण मेच्या सुरुवातीलाच तुम्हाला भारतात वाढलेल्या केसेस स्पष्टपणे दिसतील. मेच्या मध्यापर्यंत त्या मोठ्या प्रमाणात वाढतील. आणि मे महिन्याच्या शेवटी पुन्हा ६ आठवड्यांसाठी संचारबंदी करावी लागेल. ही  परिस्थिती टाळणे  म्हणजे फार मोठे आव्हान असेल.

प्रश्न – आपण तपासण्या करणे हा मूलभूत उपाय सांगत आहात. ICMR म्हणतंय की देशातील गंभीर श्वसन आजारांवर लक्ष ठेवल्यास आजाराचा प्रसार दाखवता येईल. आम्ही व्यर्थ चाचण्या करण्यात संसाधने वाया घालवू शकत नाही. काही आठवड्यांसाठी, तपासणीच्या या रणनीतीवर तुमचा काय पवित्रा आहे? 

आशिष झा –  हो. तुम्ही जास्त जोखीम 
असणाऱ्या न्यूमोनिया आणि श्वसनाचे आजार असणाऱ्या लोकांच्या तपासण्या केल्या पाहिजेत. खरं म्हणजे तुम्ही सौम्य आजार असणाऱ्या लोकांच्या आणि त्यांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांच्याही तपासण्या केल्या पाहिजेत. निरोगी लोकांचेही नमुने घेतले पाहिजेत कारण गेल्या महिन्यात आपल्याकडे २० ते २५% निरोगी आणि लक्षणे नसणाऱ्या लोकांना संक्रमण झाल्याचे आढळले आहे. आपण समाजातील अशा लोकांचे नमुने तपासणार नाही तोपर्यंत आपल्याला वाढीव आकडा आणि वास्तव परिस्थितीही कळणार नाही. आणि ही अमेरिका किंवा इटलीची रणनीती नाही. ही मानवी रणनीती आहे.

(इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी करिश्मा मेहरोत्रा यांनी ही मुलाखत घेतली असून याचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. त्यांचा संपर्क – 9146041816)

Leave a Comment