IPL 2020 : ‘या’ 5 कारणांमुळे मुंबई इंडियन्सच अंतिम सामन्यात ठरेल वरचढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आज गटविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात अंतिम सामना होणार असून आयपीएल चषक आपल्या नावावर करण्यासाठी दोन्ही संघामध्ये काटे की टक्कर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने आत्तापर्यंत आरामात फायनल मध्ये धडक मारली तर दुसरीकडे श्रेयश अय्यर नेतृत्व करत असलेल्या दिल्लीने अनेक चढ उतार पाहत अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. आजच्या अंतिम सामन्यातही मुंबई इंडियन्सचेच पारडे जड वाटतंय. आपण पाहुयात मुंबई नक्की का मजबूत वाटते.

1] बुमराह-बोल्ट ची भेदक गोलंदाजी-

मुंबईने आतापर्यंत 4 वेळा आयपीएलचं जेतेपद आपल्या नावावर केलं आहे. यामध्ये मुंबईच्या गोलंदाजांचा मोठा हात राहिलेला आहे. यावेळीही मुंबईचे बुमराह आणि बोल्ट मुंबईच्या विजयाची कहाणी लिहित आहेत. दोन्ही वेगवान गोलंदाजांनी या हंगामात 49 बळी घेतले आहे. बुमराह आणि बोल्टच्या विकेट्स या स्पर्धेत एखाद्या टीमच्या पेसर जोडीने मिळवलेल्या सर्वाधिक विकेट्स आहेत

2] आक्रमक सलामीवीर-

मुंबईच्या सलामीच्या जोडीची बॅटिंग ही त्यांचं बलस्थान आहे. क्विंटन डिकॉक, इशान किशन, रोहित शर्मा,यांनी आक्रमक फलंदाजी करून प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर सुरुवातीपासून दबाव टाकला आहे. रोहितची बॅट या मोसमात जास्त बोलली नाहीये मात्र स्पर्धेच्या शेवटच्या मॅचमध्ये तुफानी खेळी करुन शेवट गोड करण्याचा रोहित प्रयत्न करेल.

3] भरवशाचा मध्यक्रम –

मुंबईची मधल्या फळीतील बॅटिंग त्यांचं सर्वांत मोठं शक्तीस्थान आहे. ज्यावेळी रन्सचा पाठलाग करण्याचा प्रसंग येतो त्यावेळीही आक्रमक बॅटिंगचा नजारा सादर करुन आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचं काम मुंबईचे मधल्या पळीतील बॅट्समन सातत्याने करत आले आहेत. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी मुंबईला महत्त्वाच्या क्षणी तारले आहे.

4] दमदार अष्टपैलू खेळाडू-

मुंबई इंडिअन्सच्या संघात हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड आणि कृणाल पांड्या असे जागतिक दर्जाचे अष्टपैलू खेळाडू असून त्यांचा अनुभव आणि दमदार कामगिरी मुंबईच्या यशाचे गमक आहे. पोलार्ड जबरदस्त फॉर्मात असून मुंबईला आजही त्याच्या कडून पुन्हा एकदा दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

5] रोहित शर्माचे यशस्वी नेतृत्व –

कर्णधार रोहित शर्माचे कल्पक नेतृत्व हे सुद्धा मुंबईच्या यशाचे कारण आहे. रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडिअन्सने तब्बल 4 वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. कोणत्याही परिस्थितीत शांत डोक्याने विचार करून गोलंदाजांचा योग्य वापर करण्यात रोहित माहिर आहे. आता पुन्हा एकदा मुंबई रोहित शर्मा च्या नेतृत्वाखाली आयपीएल जिंकते का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment