कोरोना संकटाच्या ‘आयत्या बिळात’ लपून बसलेल्या ‘युवा नागोबांसाठी’ एक पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विचार तर कराल । प्रणाली सिसोदिया

Disclaimer: COVID-19 दरम्यान फील्डवर विविध प्रकारचं काम करणाऱ्यांसाठी, COVID-19 रुग्णांची कुठल्याही प्रकारची सेवा करणाऱ्यांसाठी, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांसाठी, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी नसलेल्यांसाठी, गरोदर मित्र-मैत्रिणींसाठी, लहान बाळ घरात असणाऱ्यांसाठी आणि अत्यंत स्व-मग्न; ज्यांना सामाजिक बांधिलकी कशाशी खातात किंवा सहवेदना म्हणजे नेमकं काय हे माहित नसलेल्यांसाठी हे मनोगत नाही.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी ‘कोरोना विरुध्दच्या युद्धात युवांची भूमिका काय?’ यावर समाजमाध्यमाद्वारे आपले विचार मांडून तरुणांना मार्गदर्शन केलं. त्यात ते म्हणतात, “MBBS च्या दुसऱ्या वर्षाला असताना परीक्षा बाजूला ठेवून बांगलादेशी निर्वासितांची आरोग्य सेवा करायला आणि इंटर्नशीप बाजूला ठेवून मराठवाड्यातील दुष्काळात आरोग्य सेवा द्यायला मी गेलो. त्यातून मला माझं कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान मिळालं, स्वधर्म कळला, माझं शिक्षण झालं आणि अभय बंग त्याच्यातून घडला.” खोलवर विचार केला तर हे वाक्य खूप वजनदार आहे.

मीही स्वतःला कोरोना दरम्यान माझ्या भूमिकेविषयी प्रश्न विचारला आणि उत्तराच्या शोधात कामाला लागली.
फिल्डवर काम करत असताना सतत मनात एक खंत होती आणि अजूनही आहे की आज जगावर एवढं मोठ्ठं संकट येऊन पडलंय, व्यवस्थेचं कंबरडं मोडलंय आणि तरीही स्वतःच्या मूल्यांना – तत्त्वांना जागणारा, सामाजिक बांधिलकी मनात ठेवून आजवर काम करणारा, समाजाप्रती सहवेदना बाळगणारा, स्वतःला पुरोगामी म्हणवणारा, समाजात खुट्ट झालं तरी पेटून उठणारा युवा आज या कोरोना संकटाच्या काळात नेमका कुठल्या बिळात लपून बसलाय? आणि का?

आज ग्रामीण भागांत, पुणे-मुंबई-नाशिक-नागपूर आणि इतर राज्यांत अनेक ठिकाणी माझे मित्र-मैत्रिणी आहेत. विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करताय; अर्थात विचारीही नक्कीच आहेत. परंतु आज समाजाला त्यांची प्रचंड गरज असताना ते आज काय करताय? (Disclaimer मधील सोडून) खरंतर दुर्दैवाने त्यांनी असुशिक्षितासारखं कोरोनाला घाबरून स्वतःला घरात कोंडून घेतलंय. आपापल्या कुटुंबासोबत लॉकडाऊन एन्जॉय करताय, सिरीज बघताय, लॅपटॉप समोर बसून ऑफिसचं काम करताय (ते करणं चूक आहे असं नाही), वेगवेगळे ट्रेनिंग घेताय आणि देताय. सरकार कसं फालतू आहे, व्यवस्था कशी कुचकामी आहे, गरिबांचे, मजुरांचे कसे हाल होताय यांच्या बातम्या बघताय, त्याविषयी सोशल मिडियावर आरडा-ओरडा करताय. अरे हो, हे सगळं करा ना पण त्यासोबत दिवसातून किमान २ – ४ तास फिल्डवर जाऊन कामही करा, या सगळ्यापेक्षा तिथे तुमची जास्त गरज आहे.
अरे मी तर म्हणते खड्ड्यात गेलं तुमचं ऑफिसचं काम, ट्रेनिंग आणि सर्व काही. आज फक्त आणि फक्त माणूस वाचणं महत्वाचं आहे. आज समाजाचं जे काही मानसिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि नीतीच्या, माणुसकीच्या पातळीवर हनन होत आहे ते थांबवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते युवा वर्गच करू शकतो.

आज जर तुम्ही वंचितांना, गरिबांना आणि इतरांनाही तुमच्यातला राम नाही दाखवला ना तर ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून या समाजाचा तुमच्यावरचा विश्वास उठेल. मी म्हणते बाहेर पडून कवडीचंही काम न करता व्यवस्थेविरुध्द, सरकार विरुध्द, लोकांच्या होणाऱ्या हाल-अपेष्टांविरुद्ध बोलण्याचा नैतिक अधिकार तरी तुमच्यापाशी आहे का? एरवी बोलताना किती मोठमोठ्या बदलाच्या भाषा करतात, लोकांना शिकवतात, स्वतःला गांधी-विनोबांचे अनुयायी म्हणवतात, समाजवादी, पुरोगामी आणि काय काय पालुपदं लावतात. आज जर तुम्ही काहीही काम करत नसाल तर माझ्यालेखी हे सर्व झूट आहे, अत्यंत दांभिकपणा आहे हा!

आज समाजाला युवावर्गाची मोठ्या प्रमाणात गरज असतानाही तुमच्यातला माणूस, तुमच्यातला विवेक तुम्हाला घरात कसा बसू देतोय? आज इतका मोठ्ठा वर्ग उपाशी झोपत असताना तुमच्या गळ्याखाली घास तरी कसा उतरतोय? काहीतरी ‘क्ष’ रक्कम मदत म्हणून देऊन हात वर करताना इतर जबाबदारी झटकण्याचा दांभिकपणा कुठ्न आलाय तुमच्यात? गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रश्न खरंच मला खूप छळताय.
अर्थात, मीही या युवा वर्गाचाच भाग असल्याने आणि माझ्यासारख्या असंख्य युवांना मी आपलं मानत असल्याने प्रेमाच्या अधिकाराने मी आज हे प्रश्न तमाम युवा वर्गाला (Disclaimer मधील सोडून) विचारतीये.

मात्र याच्या दुसऱ्या बाजूला माझे काही युवा मित्र-मैत्रिणी जीवाची पर्वा न करता जिथे शक्य होईल तिथे जाऊन काम करताय. परंतु दुर्दैवाने ही नावं बोटावर मोजण्याइतकीच आहेत. या सर्वांना माझा हृदयातून सलाम! विशेष म्हणजे युवांसोबत अशी काही नावं माझ्या आजूबाजूला आहेत; ज्यांना जीव धोक्यात घालून काम करताना मी जवळून बघतेय. जे साठीच्या पुढचे आहेत, कोरोनाचा धोका त्यांना आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे आणि तरीही ते कंबर कसून समाजात जाऊन काम करताना दिसताय. ६५ वर्षांच्या मेधा पाटकर या गावोगाव फिरून मजुरांच्या घरी जाण्याचा मार्ग सोपा करताय, जळगावातील ६६ वर्षांचे दिलीप चौबे सर घरोघरी गॅस मिळावा म्हणून रोज ऑफिसला येऊन बसताय, गरिबांना अन्न-पाणी-औषधी वाटताय, जळगावातीलच ६१ वर्षांच्या वासंती दिघे गोरगरीब जनतेला शोधून त्यांना अन्न पुरवताय, मजुरांचे प्रश्न मार्गी लावताय, ९१ वर्षांचे बाबा आढाव पुण्यात कष्टकरी कुटुंबांच्या प्रश्नांना जातीने तोंड देताय, माझे स्वतःचे वडील ६२ वर्षांचे असूनही एकही सुटी न घेता बँकेत अविरत सेवा देताय. अशी अजून कितीतरी उदाहरणं असतील. यांच्यात एवढं दहा हत्तींचं बळ आलंय आणि युवा वर्ग मात्र स्वतःची सामाजिक जबाबदारी झटकून स्वतःतच मश्गुल राहतोय! हे चित्र खूप दुर्दैवी आहे. अस्वस्थ आणि दुखी करणारं आहे. किमान माझ्या संपर्कातील मित्र-मैत्रिणींकडून तरी मला अशा अपेक्षा नव्हत्या.

खरंतर ही कळकळ म्हणजे ‘तुम्ही काम न करणारे कसे कुचकामी आहात’ हे दाखवण्यासाठी नक्कीच नाहीये, किमान माझातरी तसा हेतू नाहीये. परंतु एक मात्र खरंच सांगते की या लेखाच्या निमित्ताने एक समाजशील माणूस म्हणून तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण नक्की करावं, तुमची स्वतःची एक भूमिका ठरवावी आणि सद्यपरिस्थितीत वेगवेगळ्या कारणांनी ओघळणारे अश्रू पुसून समाजमनाला थोडंतरी हसवावं!
स्वानुभवातून एकच सांगेल दोस्तांनो की आज जो गोरगरीब समाज एकवेळ मिळेल ते खाऊन उपाशी झोपतोय, मजूरवर्ग बेवारशासारखा रस्त्यावर मरतोय या सर्वांना आज आपल्या आधाराची प्रचंड गरज आहे. आपल्यातली सहवेदना जागृत करून होरपळून निघणाऱ्या या वर्गाला “सगळं काही ठीक होईल, आम्ही तुमच्यासोबत आहोत.” एवढाच विश्वास देण्याची गरज आहे. तुमच्यातला चार भिंतीतला सामाजिक कार्यकर्ता जोवर बाहेर पडून फिल्डवर काम करत नाही तोपर्यंत तुम्ही घडण्याचे दरवाजे बंद राहतील. मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही युवा वर्गाला तुमच्यातला राम दाखवण्याची संधी नक्कीच आहे!

– प्रणाली सिसोदिया, जळगाव
(लेखिका ‘वर्धिष्णू’ या जळगाव शहरातील कचरावेचक मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेसोबत कार्यरत आहेत.)
मोबाईल – 97674 88337
ईमेल – [email protected]

Leave a Comment