डॉक्टर, पोलीस याच्यापलीकडे हे पण आहेत जे मैदानात उतरुन कोरोनाशी सामना करतायत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लढा कोरोनाशी । कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे शहरांमधील बरेच व्यवहार सध्या बंद आहेत. घराबाहेर पडणे म्हणजे या रोगाला आमंत्रण देण्यासारखेच असल्यामुळे बहुतेक लोकांनी काम बंद ठेवले आहे किंवा ते घरून काम करत आहेत. पण अशा वातावरणातही काही अत्यावश्यक सेवा पुरवणारे लोक आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावित आहेत. शहरातील कचरा गोळा करणारे हजारो सफाई कामगार जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपले काम चोख बजावताना दिसत आहेत.

पुण्यातील कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेशी निगडीत सुमारे ३६०० सफाई कामगार रोज शहरातून जवळपास ११०० टन एवढा कचरा शहरातून उचलला जातो. यापैकी पुनर्वापर करण्यायोग्य असलेला कचरा पुनर्वापर बाजारात विकला जातो, ओला कचरा कम्पोस्ट खत बनवण्यासाठी नेण्यात येतो आणि उरलेला कचरा डेपोवर जातो.

‘स्वच्छ’ सोबत काम करणाऱ्या वैभव साबळे यांच्या म्हणण्यानुसार सध्या कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे सर्वच कर्मचाऱ्यांना भीतीखाली काम करावे लागत आहे. “आम्ही सुरक्षेची साधने वापरत आहोत आणि शक्य तितक्या दूर राहून लोकांसोबत बोलत आहोत. तरीही माझा दररोज अनेक नागरिक, इतर सफाई कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी अशा अनेक लोकांशी संपर्क येतोच. त्यामुळे कोरोनाची बाधा होण्याचा धोका कायम वाटत रहातो. पण असं असलं तरी आमचं काम थांबवून चालत नाही याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.” असं वैभव सांगतात.

लाॅकडाऊनमुळे पुनर्वापरासाठी कचरा घेणारी दुकाने बंद आहेत. त्यामुळे जिथे कचरा एकत्र आणला जातो अशा ‘फिडर पाॅइंट्स’ वर हाताने ढकलायच्या कचऱ्याच्या ट्राॅलीची नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसत आहे. अशा साथीच्या काळात जास्त कचरा पाहून जवळ रहाणारे नागरिक घाबरून जात आहेत. काही नागरीक या स्वच्छतादूतांचे प्रयत्न पाहून कृतज्ञताही व्यक्त करत आहेत.

आपल्याला आलेला असाच एक अनुभव सांगताना वैभव सांगतात, “काही दिवसांपूर्वी कोंढव्यातील एका फिडर पाॅइंटवर कचरा साठलेला पाहून जवळ रहाणारे नागरीक घाबरले आणि त्यांनी आम्हाला कचरा दूर करायला सांगितले. पुनर्वापरयोग्य कचरा घेणारी दुकाने बंद आहेत असं सांगूनही त्यांचं समाधान झालं नाही. कचरा हटवला नाही तर आम्ही तो जाळून टाकू असं त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही त्यांच्याकडून थोडा वेळ मागितला आणि लगेच कामाला लागलो. महानगरपालिकेच्या गाड्यांच्या सहाय्याने आम्ही संध्याकाळपर्यंत सगळा कचरा हटवला. संध्याकाळी जेव्हा नागरीक परिस्थिती पहायला परत आले तेव्हा सगळा कचरा गेलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. हे पाहून त्यांनी सगळ्यांनी आमच्यासाठी टाळ्या वाजवल्या. त्यांच्या या कृतीने आमच्याही डोळ्यात पाणी आले.”
कचरा गोळा करण्याचे काम अत्यावश्यक सेवांमध्ये येतं आणि कचरा गोळा करून त्याचं नीट व्यवस्थापन करणे हे या काळात जास्त महत्वाचं आहे. डॉक्टर, नर्स, पोलिस, बँक कर्मचारी यांच्यासारखेच कचरा वेचक हे आजचे समाजाचे नायक आहेत. जे इतक्या अडचणी असताना, भीतीचे वातावरण असताना, लांब अंतर पायी चालत येऊन सुद्धा रोज कामावर येत आहेत.

बाराही महिने शहरातील आरोग्याचे संरक्षण करणाऱ्या सफाई कामगारांना मदत करायची असल्यास [email protected] वरती अथवा ९७६५९९९५०० या हेल्पलाईन वरती संपर्क साधू शकता.

Leave a Comment