एसटी कर्मचाऱ्यांचा संप: औरंगाबाद शहरातील स्मार्ट शहर बससेवा ठप्प

औरंगाबाद – एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांच्या संपाचा फटका औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवेला ही बसला असून मागील बारा दिवसांपासून शहर बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी ला दररोज पावणेतीन लाख रुपयांवर पाणी सोडावे लागत असून, प्रशासनाने बस सेवा सुरू करण्यासाठी पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि अस्मार्ट प्रशासनामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल-बेहाल होत आहेत.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये समावेश झाल्यावर औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रशासनाने जानेवारी 2017 मध्ये तब्बल 250 कोटी रुपयांमध्ये 100 बसेस खरेदी केल्या होत्या. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत असावी या दृष्टीने तत्कालीन आयुक्तांनी एसटी महामंडळ सोबत मनुष्यबळासाठी करार केला. पाच वर्षे मनुष्य बळ देण्यासाठी एसटी महामंडळाने करार केला आहे. महामंडळाने दिलेल्या मनुष्यबळाचा पगार दर महिन्याला स्मार्ट सिटी प्रशासन करीत आहे. कोरोनाची पहिली, दुसरी लाट वगळता बस सेवा शहरात सुरळीत सुरू होती. मात्र दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. या संपाचा फटका औरंगाबाद स्मार्ट सिटी लाही बसला आहे.

शहर बस सेवेत काम करणार्‍या चालक-वाहकांना 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी संपात सहभाग घेतला. त्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू झाले. 6 नोव्हेंबर पर्यंत त्यांनी कामही केले. मात्र, 7 नोव्हेंबर पासून सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने कर्मचारी पुन्हा संपात सहभागी झाल्याने शहर बस सेवा ठप्प झाली आहे. यामुळे शहर बस सेवा ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी तसेच प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे.

दररोज पावणेतीन लाखांवर पाणी –
शहरातील शहर बस सेवा दररोज सुमारे 10 ते 11 हजार किलोमीटरचा प्रवास करत होती. त्यातून स्मार्ट शहर बस प्रशासनाला दररोज सुमारे पावणेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. परंतु मागील बारा दिवसांपासून शहर बससेवा ठप्प असल्याने स्मार्ट शहर प्रशासनाला दररोज सुमारे पावणेतीन लाख रुपयांवर पाणी सोडावे लागत आहे.