हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कृषि क्षेत्रासाठी जवळपास साडे चार लाख कोटी रुपयाच्या पत आराखड्यास मंजुरी देत अनेक भरीव तरतुदी केल्या. सोबतच इज ऑफ डूईंग बिझिनेस च्या धर्तीवर कृषी क्षेत्रासाठी देखील एकल खिडकी योजना राबविण्याची सूचना केली.या तरतुदी अंतर्गतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या “पंजाबराव देशमुख कृषी व्याज परतावा योजने”चा देखील विस्तार झाला आहे.पूर्वी या योजनेअंतर्गत १ लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज मिळायचे त्यात घसघशीत वाढ देऊन ही कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाढवून दिलेल्या याच प्रशंसनीय अशा वाढीव कर्ज निर्णयाची तालुक्यात लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना या वाढीव कर्जाचा लगेचचं लाभ मिळावा यासाठी तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने बँकांना वाढीव कर्ज वाटपाच्या सूचना कराव्यात, असे निवेदन आज साक्री तालुका यूवा सेनेच्या वतीने प्रविण चव्हाणके,तहसीलदार व दंडाधिकारी साक्री देण्यात आले.
या प्रसंगी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना साक्री तालुका युवा सेना प्रमुख चेतन (बाळासाहेब) देवरे यांनी सांगितले की “अहो आमच्या तालुक्यातील शेतकरी खूप कष्टाळू आणि कर्तृत्ववान आहे.अगदी कमी म्हणजे फक्त ५० ते ६० मिली वार्षिक पर्जन्य असताना तो न डगमगता, कुठल्याही आपत्तीची पर्वा न करता फक्त कष्टाच्या बळावर शेती पिकवतो.त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकार मदतीचा हात देऊ इच्छित आहे तर ती मदत त्याला लगेच मिळावी यासाठी आम्ही हे निवेदन दिले. शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत बँका प्रचंड प्रमाणावर अनास्था दाखवतात तिला कुठेतरी आळा बसावा याकामी उद्धव ठाकरे साहेबांनी उचललेलं हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं सरकार आहे, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी निवेदन देताना केशव शिंदे,पंकज मारनर,हिम्मत सोनवणे, जिवा पाटील,पंकज गवळे,वैभव भिंगारे,शुभम सोनवणे,निलेश खैरनार,दीपक बोरसे आदी उपस्थित होते.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.