स्टिंग ऑपरेशन : सैदापूर ग्रामपंचायत मधील निविदा घोटाळ्याचा पर्दाफाश
सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावरच असणाऱ्या सैदापूर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभार समोर आला आहे. दि. 9 डिसेंबर रोजी एका दैनिकात प्रसिद्ध निविदेचा कालावधी सुट्टी वगळून दोन दिवसांचा ठेवून नियमांची पायमल्ली केली आहे. बेकायदेशीररित्या निविदा प्रसिद्ध होण्यापूर्वीच मंजुरी शिवाय कामाचे कंत्राट मर्जीतील कंत्राटदाराला देण्याचा प्रकार घडला आहे. या भ्रष्ट कारभारामुळे आता सैदापूर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर सैदापूर ग्रामपंचायतीत सहायक गटविकास अधिकारी श्री. निकम यांनी भेट देवून दोन दिवसात चाैकशी अहवला सादर करणार असल्याची माहिती दिली आहे.
सदरील निविदा प्रसिद्ध झालेल्या कालावधीत काम मागणीचा अर्ज करूनही कंत्राटदारांना अंदाजपत्रकाची प्रत देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. तर कंत्राट मॅनेज असल्याचा गौप्यस्फोट स्वतः ग्रामसेवकांनी केला आहे. याबाबतचा तक्रारी अर्जही ग्रामपंचायती मार्फत फाडण्यात आला आहे. याबाबतचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आला आहे. यावेळी ग्रामविकास सेविकेची काही खळबळजनक खुलासाही केला आहे.
ग्रामसेविकेने याबाबत सरपंचाकडे संपर्क करण्याचा गोपनीय सल्लाही दिला. स्टिंग ऑपरेशन करून ग्रामसेविकेची पोलखोल केली आहे. या दरम्यान ग्रामपंचायत सदस्याने मधस्थी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुद्धा अनेकदा केला आहे. तरीही सदरची माहिती कोणत्याही आमिषाला बळी न पडता मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांना दिली होती. ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्याने याबाबतची विचारणा करून सात दिवसात अहवालाची मागणी करू अशी ग्वाही दिली होती. परंतु सात दिवसानंतर या प्रकरणाचे नेमके काय झाले, याचा सुगावा लागला नाही. उलट स्वतःला वाचवण्यासाठी बेकायदेशीर कागदपत्रांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सरपंचांना कामाबाबत पूर्ण माहिती नसल्याचे अनेकांचे मत आहे. ग्रामसेविका या प्रकरणापासून वाचण्यासाठी अन्य मार्ग स्विकारण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे साताऱ्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी दोन दिवसात अहवाल सादर करण्याबाबतचे तोंडी आदेश विभाग प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्याधिकारी
या प्रकरणात नेमके काय करणार याकडे आता सैदापूर ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष लागून राहिले आहे.