दहिवडी | वाकी-वरकुटे (ता. माण) येथे माण नदीपात्रातील वाळू चोरी करुन साठा केलेला 72 हजार किमतीची 12 ब्रास वाळू प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी जप्त केली. या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकी-वरकुटे येथे ठेंगील वस्ती परिसरातील गट नंबर 158 मधील पडीक क्षेत्रात वाळू उपसा करुन तो विक्री करण्याच्या साठा करुन ठेवला होता. त्याची खबर प्रांताधिकाऱ्यांना लागताच गौणखणिज व वाळू भरारी पथकाने छापा घालून अवैधरित्या साठा केलेल्या वाळूचा साठा जप्त केला. ही वाळू म्हसवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. जिल्हा गौण खणिज अधिकारी अमोल थोरात, प्रभारी तहसिलदार विलास करे, मंडल अधिकारी सिध्दनाथ जावीर, सहाय्यक तुषार पोळ, युवराज खाडे, तलाठी गुलाब उगलमोगले, संतोष ढोले यांनी कारवाईत भाग घेतला.
वाळूचोरी प्रकरणी शेतकऱ्यांवरही फाैजदारी कारवाई होणार
माण नदीपात्रातील वाळू चोरीच्या प्रकारावर नियंत्रण राखण्यासाठी ड्रोन कॅमेराच्या सहाय्यानेने नदीपात्रात टेहळणी केली जात आहे. वाळूची तस्करी करण्यासाठी नदी पात्रालगतच्या शेतातून रस्ते तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. अशा सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करुन संबंधित शेतकऱ्यांना रस्ते बंद करण्याबाबच्या नोटीसा पाठविल्या असून या कार्यवाहीत संबधिताकडून प्रतिसाद मिळाला नाही तर ज्या-ज्या ठिकाणच्या रस्त्यावर वाळूची चोरटी वाहने सापडतील. त्या रस्त्याशी संबंधित शेतकऱ्यांवरही फौजदारी कारवाई करण्याचा इशारा शैलेश सुर्यवंशी यांनी दिला आहे.