खंडाळा | शिंदेवाडी, (ता. खंडाळा) येथे दोन कंटेनर्स चालकांमध्ये पत्नीच्या चारित्र्यावरून झालेल्या वादावादीत एका ट्रक चालकाने दुसऱ्या ट्रक चालकाच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शिवानंद पुजारी (वय- 36, रा. बिदर, कर्नाटक) याला अटक केली आहे. तर ट्रक चालक स्वप्निल गीते (वय- 32 रा.धामणगाव ता. बार्शी जि. सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिंदेवाडी गावच्या हद्दीत हायवेनजीक असलेल्या एका पेट्रोल पंपालगत मोकळ्या जागेमध्ये पुणे येथील एका कंपनीच्या ट्रान्स्पोर्टचे दोन कंटेनर थांबले होते. यावेळी चालक राहुल काशीद, बिरलिंगेश्वर हालसे हे रात्रीचे जेवण बनवत होते. तर स्वप्निल गीते, लक्ष्मण ऊर्फ सोमनाथ देशमुख, शिवानंद पुजारी हे दारू पीत बसले होते. यावेळी अचानक स्वप्निल गीते हा लक्ष्मण देशमुख याच्या पत्नीच्या चारित्र्यावरून घाणेरड्या भाषेत बोलला. यावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. यावेळी गीते याने बाजूला पडलेला दगड देशमुखच्या डोक्यात मारला. या वादात देशमुख जखमी झाल्याने चालक राहुल काशीद व बिरलिंगेश्वर हालसे हे भांडण सोडवू लागले. त्यावेळी गीते याने चिडून राहुल व बिरलिंगेश्वर या दोघांना शिवीगाळ करत दगड फेकून मारले. तर शिवानंद पुजारी यांनी गीतेला आवरले.
मात्र, त्यांचा वाद विकोपाला गेला. त्याच यादरम्यान स्वप्नील गीते व शिवानंद पुजारी यांची जोरात भांडणे सुरू झाली. या वादात पुजारी यांनी स्वप्निल गीते याच्या डोक्यात बाजूला पडलेला भला मोठा दगड उचलून मारला. यामध्ये गीते हा जाग्यावरच ठार झाला. यानंतर पुजारी याने घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेची फिर्याद घटनेची बिरलिंगेश्वर हालसे यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपासाला लगेच सुरूवात केली. पुजारी याला अवघ्या 1 तासात अटक केली.