औरंगाबाद – बाबा पेट्रोल पंप येथून एमजीएम शिक्षण संस्थेकडे येत असलेल्या एका विद्यार्थिनीची रिक्षात बसल्यानंतर छेड काढण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी रिक्षाचालकास चोप देत पोलीस ठाण्यात पकडून आणले. दुसरा आरोपी पळून गेला. मध्यरात्री उशिरापर्यंत क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
क्रांती चौक ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, एमजीएम संस्थेत शिक्षण घेत असलेली एक विद्यार्थिनी बाबा पेट्रोल पंप येथून रिक्षात (एमएच 20 ईएफ 9006) सेव्हन हिल येथे जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा गयास अस्लम बागवान (वय 30, रा. गारखेडा परिसर) याच्या रिक्षात बसल्यानंतर एका प्रवाशाने काही अंतर गेल्यानंतर विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिने त्याच्या थोबाडीत मारली. त्याचवेळी चालकही छेड काढणाऱ्याची साथ देऊ लागला. त्यामुळे मुलीने आरडाओरड करीत रिक्षा थांबवली. त्याचवेळी जवळून जात असलेल्या एका वकील महिलेने दुचाकी थांबवत विद्यार्थिनीस मदत केली. त्याचवेळी रिक्षाचालकाच्या थोबाडीतही दिली.
यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. तेव्हा दोघांपैकी एक जण पळून गेला. एकास नागरिकांनी मारहाण करीत पकडून नंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात आणले. ठाण्यात विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.