परीक्षा कालावधीत विषय शिक्षकांना ‘त्या’ दिवशी शाळेत ‘नो एंट्री’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षा मार्च-एप्रिल महिन्यात होणार आहे. यंदा परीक्षेसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने कडक धोरण आखले असून परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या दिवशी विषय शिक्षकांना बंदी घालण्यात आली आहे.

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑॅफलाइन पद्धतीने होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्यात आले आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना 14 फेब्रुवारीपासून; तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा आजपासून सुरू होत आहे. बारावीची लेखी परीक्षा 4 ते 30 मार्चदरम्यान; तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. यंदा शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने पूर्वी केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना मुख्य परीक्षा केंद्र; तर नव्याने केंद्र दिलेल्या शाळा, महाविद्यालयांना उपकेंद्र असे संबोधण्यात आले आहे. मुख्य तसेच उपकेंद्राचे कामकाज पाहणारे केंद्रसंचालक हे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य राहतील. 15 पेक्षा कमी आवेदनपत्र भरलेल्या शाळा या मुख्य केंद्रास जोडण्यात आल्या आहेत.

परिरक्षक कार्यालयातून मुख्य परीक्षा केंद्रास प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी सहायक परिरक्षक राहतील़. मुख्य केंद्राकडून उपकेंद्राकडे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी संबंधित उपकेंद्राचे शिक्षक (रनर) असणार आहे. दरम्यान, परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी ज्या विषयांचा पेपर असेल त्या विषयांच्या शिक्षकांना शाळा, परीक्षा केंद्रांवर प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. पेपरच्या दिवशी संबंधित विषय शिक्षकांना परीक्षेचे काम देऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment