सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
साखर कारखान्यांना १४ दिवसांचे बंधन असूनही कारखानदारांनी अद्याप एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. पूर्वीप्रमाणे कारखान्यांची रिकव्हरी बेस ९.५ इतका करावा आणि गेल्या वर्षीच्या हंगामातील थकीत रक्कम शेतकऱ्यांना मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे यांच्यासह शेतकरी सोमवारपासून कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे
यापूर्वी वारंवार मागणी करूनही शासनाकडून एफआरपी न देणाऱ्या कारखानदारांवर कोणतीच ठोस कारवाई होत नाही. यावर्षीचा कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला आहे. मात्र असे असूनही काही कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने रिकव्हरी बेस बदलला असून त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होत आहे. त्यामुळेच पूर्वीप्रमाणे ९.५ हाच रिकव्हरी बेस ग्राह्य धरला जावा, अशी मागणी स्वाभिमानीकडून करण्यात आली .
तर कोणत्याही स्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यावेळी देण्यात आला.