महावितरणाने विज तोडणी केल्याने तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

डोळ्यादेखत पाण्याअभावी पीक सुकून चालल्याने केलीआत्महत्या

बीड : गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील 23 वर्षी या तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले ही दुर्दैवी घटना रविवार दि.28 यादिवशी घडली आहे. कृष्णा राजाभाऊ गायके वय 23 वर्ष राहणार निपाणी जवळका असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नाव आहे. वीज वसुली साठी महावितरण कंपनीने शेतातील विद्युत पंपाचे कनेक्शन कट केले आहे. परिणामी शेतातील पिके पाण्याअभावी सुकू लागली असून, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

खरिपाचे हातातोंडाशी आलेली पिक सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले. यामुळे शेतात केलेला खर्च पूर्णतः वाया गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले दरम्यान या अतिवृष्टीची मदत शासनाकडून जाहीर झाली असली, तरी अजून ती शेतकऱ्याच्या हातात पडत नाही तोच महावितरण कंपनीने शेतकर्‍यांना कोंडीत पकडले आहे.शेतातील पंपाची थकीत बिल भरण्यासाठी वीज कनेक्शन कट केलेले आहे. खरीप हंगामातील पिके अगोदरच वाया गेल्याने सध्या महावितरण कंपनी ने वीज कनेक्शन कट केल्याने रब्बी ची पिके सुकू लागली आहेत.

अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे वीज बिल भरण्यासाठी पैसे नसताना महावितरण कंपनीने मात्र सक्तीची वीज बिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. आठ दिवसापासून तालुक्यातील शेतातील विद्युत पुरवठा खंडित केल्याने रब्बी पिके सुकून जात आहेत. विहिरीत मुबलक पाणी असताना वीज कनेक्शन कट केल्याने पाणी पिकांना देता येईना यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात अधिकच भर पडली असून शेतकरी नैराश्याने टोकाचे पाऊल उचलत असल्याने अशा घटना घडत आहेत.

गेवराई तालुक्यातील कृष्णा राजाभाऊ गायके या तरुण शेतकऱ्याने शेतातील पिके डोळ्यासमोर सुकू लागली तसेच कांदा गोटसाठी आणलेली बियाणे लावता येत नसल्याने नैराश्यातून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना आज दिनांक 28 रोजी दुपारी घडली असून महावितरणाच्या तुघलकी कारभारामुळे एका तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे