प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यामुळे नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

लुधियाना : वृत्तसंस्था – प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे. तीन वर्षांपासून या तरुणाचं एका तरुणीवर प्रेम होतं. तो वारंवार तिला लग्नासाठी विचारणा करत होता. मात्र सतत मिळणाऱ्या नकारामुळे निराश झालेल्या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. हरियाणातील जिंद भागात राहणाऱ्या 24 वर्षांच्या विकासचं गावातीलच एका मुलीवर प्रेम होतं. गेल्या तीन वर्षांपासून तो तिला लग्नासाठी मागणी घालत होता. मात्र तरुणी त्याला सतत नकार देत होती. एकदा तर विकास घरच्यांना घेऊन तरुणीच्या घरी तिला मागणी घालायलाही गेला होता. मात्र तरुणी तयार नसल्याने तिच्या घरच्यांनी विकासाला नकार दिला. तेव्हापासून विकास नैराश्यात होता.

मागच्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न
मागच्या वर्षीसुद्धा विकासने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने स्वतःच्या गळ्यावर आणि हातावर ब्लेडने वार करत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता पुन्हा लग्नाला नकार मिळाल्यानंतर निराशेच्या गर्तेत या तरुणानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पटियाला हायवेवर पोलिसांना विकासाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना त्याच्याकडे सुसाईट नोट सापडली असून त्यात तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांची नावं लिहिलेली आहेत.

तरुणीच्या भावाने केली होती तक्रार
विकासने घरात घुसून गोळीबार केल्याची तक्रार तरुणीच्या भावाने नोंदवली होती. त्यानंतर पोलीस विकासचा शोध घेत होते. तरुणीला लग्नासाठी विचारणा करायला गेला असताना विकासनं रागाच्या भरात बंदूक चालवल्याचं तरुणीच्या भावाने सांगितले. विकासच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

You might also like