औरंगाबाद | मुलीचे वय अवघे (15 वर्षे दहा महिने 14 दिवस) आणि मुलाचे वय अठरा वर्ष. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं पण नातेवाईकांनी विरोध केला असता, ते पळून गेले व लग्न लावून द्या अन्यथा आम्ही आत्महत्या करतो अशी धमकी प्रेमीयुगुलाने दिली. त्यानंतर घाबरलेल्या नातेवाईकांनी त्यांना शोधून आणले आणि त्यांच्या हट्टापायी लग्न लावून दिले. मात्र दोघेही अल्पवयीन असल्याने बालविवाह कायद्याने गुन्हा असल्यामुळे दोन्हीकडील नातेवाईकांसह नवरदेवावर बालविवाह प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिसारवाडीतील गल्ली क्र. 10 मधील संजीवनी हॉस्पिटल जवळ येथे एक बाल विवाह झाल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी गणेश सांडू पुंगळे यांना मिळाली होती. त्यानुसार 16 मे रोजी त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन नवरी नवरदेवाचे त्यांच्या आई-वडिलांना सिडको ठाण्यात बोलावून घेतले. तेथे मुलीची आई आणि मुलाची आई यांचा जबाब घेण्यात आला. त्यांच केवळ लग्न जुळवले असून साखरपुडा केल्याची माहिती त्यांनी दिली.
17 मे रोजी अल्पवयीन मुलीला पालकांसह बालकल्याण समितीसमोर हजर केले. तेथे तिचा जबाब नोंदवला असता तो संशयास्पद आढळला. त्यावरून चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून बालकल्याण समितीला काही फोटो मिळाले. त्यानुसार लग्न झाल्याचे स्पष्ट झाले. यात मुलगी ही पंधरा वर्ष दहा महिने व चौदा दिवस तर मुलगा हा अठरा वर्षे चार महिने इतक्या वयाचा असल्याचे समोर आले. त्यावरून पुंगळे यांच्या फिर्यादीनुसार मुलीची आई, तिचे वडील, मुलाची आई व मुलगा यांच्याविरुद्ध सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास उपनिरीक्षक पी.जी. अबुज करीत आहेत.
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर होतात बालविवाह :
मराठवाड्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोरी- छुप्या पद्धतीने बालविवाह होतात. पण याची माहिती कुणी समोर येऊ देत नाही. ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून सुद्धा बालविवाह केले जातात.