…तर हात तोडून हातात देईन; पुण्यातील राड्याच्या घटनेनंतर सुप्रिया सुळेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल पुणे येथे भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पावित्रा घेतला आहे. “महाराष्ट्रात यापुढे महिलेवर कुठल्याही पुरुषाने हात उभारल्यास त्याचा हात तोडून मी त्याच्याच हातात देईन,” असा इशारा सुप्रिया सुळे यांनी आज दिला आहे.

जळगावमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी सुळे म्हणाल्या की, या महाराष्ट्र राज्यात सर्व महिलांचा सन्मान केला जातो. तशी शिकवण आम्हाला मिळालेली आहे. हा शाहु-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. काल पुण्यात एक घटना घडली. आता यापुढे जर या राज्यात कुठल्याही पुरुषाने जर महिलांच्या अंगावर हात उचलला तर मी स्वत: तिथे जाईन आणि त्याविरोधात कोर्टात जाईल. त्याचा हात तोडून त्यांच्या हातात देईन,” असा इशारा सुळे यांनी दिला.

नेमके काय घडले होते पुण्यात?

सोमवारी बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. याठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन करण्यात येणार होते. ज्यावेळी स्मृती इराणी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आल्या त्यावेळी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करत घोषणाबाजीला सुरुवात केली. महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करताच भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले. आणि भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उगारण्यात आला. या प्रकरणात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment