Thursday, February 2, 2023

‘…त्यांच्यामुळेच वर्ल्ड कप जिंकलो’, भारताच्या ‘या’ खेळाडूने केले ग्रेग चॅपल यांचे कौतुक

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला होता. भारताच्या या विजयाचे श्रेय कर्णधार एमएस धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना देण्यात आले होते. पण त्यावेळी टीम इंडियामध्ये असणाऱ्या सुरेश रैना याने मात्र ग्रेग चॅपल यांच्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रेग चॅपल यांचे कौतुक करणारा सुरेश रैना हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. ग्रेग चॅपल यांना 2005 साली भारतीय टीमचे प्रशिक्षक बनवण्यात आले होते.

ग्रेग चॅपल यांची कारकीर्द खूप वादग्रस्त ठरली होती. ते दोन वर्षे भारतीय टीमचे प्रशिक्षक होते. या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांचात आणि कर्णधार सौरव गांगुली यांच्यात बरेच वाद झाले होते. या वादानंतर सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून पाय उतार व्हावे लागले होते. 2007च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम पहिल्याच राऊंडला बाहेर पडल्यानंतर चॅपल यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.सुरेश रैनाने त्याच्या आत्मचरित्र ‘बिलिव्ह, व्हॉट लाईफ ऍण्ड क्रिकेट टॉट मी,’ या पुस्तकात चॅपल यांच्या प्रभावाबाबत सांगितले आहे. सुरेश रैना म्हणाला चॅपल हे प्रशिक्षक असताना सुरेश रैना, श्रीसंत आणि मुनाफ पटेल यांनी टीम इंडियामध्ये पदार्पण केले होते. भारताच्या 2011 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीममध्ये हे तिन्ही खेळाडू होते.

- Advertisement -

‘ग्रेग चॅपल यांना भारतीय खेळाडूंची एक पिढी तयार करण्याचे श्रेय मिळायला पाहिजे. त्यांनी ज्या बी रोवल्या, त्याची फळं नंतर मिळाली, जेव्हा आपण 2011 वर्ल्ड कप जिंकलो. त्यांच्या कारकिर्दीमध्ये बरेच वाद झाले, पण त्यांनी टीमला जिंकवणं आणि जिंकवण्याचं महत्त्व सांगितलं,’ असे सुरेश रैना यांनी आपल्या पुस्तकात म्हंटले आहे. भारतीय टीम 90 च्या दशकात आणि 2000 सालच्या सुरुवातीला आव्हानाचा पाठलाग करताना अपयशी ठरत होती. पण जेव्हा चॅपल प्रशिक्षक आणि राहुल द्रविड कर्णधार होता तेव्हा भारताने आव्हानाचा पाठलाग करताना लागोपाठ 14 मॅच जिंकल्या. ‘त्या काळात आम्ही चांगले खेळत होतो, पण टीम बैठकीमध्ये चॅपल आव्हानाचा पाठलाग करण्यावर जोर द्यायचे,’ असेदेखील रैनाने आपल्या पुस्तकात लिहिले आहे.