परभणी जिल्ह्यात दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदान, गोदाकाठच्या ७ गावांचा मतदानावर बहिष्कार कायम

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदान संथ गतीने चालू असुन दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ५२.८६ टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ पाथरी मतदारसंघात ४९.३५ टक्के तर गंगाखेड आणि परभणी विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे ४३.९२ आणि ४३.७४ टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांचा केंद्रात येण्याचा वेग वाढेल आणि ६० ते ६५ टक्के मतदान होईल अशी अपेक्षा आहे.

अकोला जिल्हयात ३ वाजेपर्यँत ४२.६ टक्के मतदान

जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मुर्तीजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांमधील १७०३ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता पासून मतदानास सुरुवात झाली. ढगाळ वातावरण असतानाही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून, सकाळी अकरा वाजेपर्यंत पाचही मतदारसंघांमध्ये सरासरी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात सरासरी ४२.६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. अकोट- ४५. ४१ टक्के, २९-बाळापूर टक्के, ४६.६३ टक्के, अकोला पश्चिम- ३७.८६ टक्के, अकोला पूर्व- ४०.७१ टक्के, मूर्तिजापूर- ४०.६९ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

राज्यात विविध ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड, अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी देखील आल्या आहेत. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला.

मतदारांनो ‘या’ मुलीचा आदर्श घ्या…!

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सुट्टी असल्याने अनेक जण मतदान करण्याऐवजी घरीच आराम करण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याच बेत आखतात. मात्र मतदान आपलं कर्तव्य आहे, याचा अनेकांना विसर पडतो. मात्र समाजात अशीही काही मंडळी आहेत, ज्यांना कठीण परिस्थितीतही आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. दिंडोरी विधानसभा निवडणुकीत पेठ शहरातील खातून मुस्ताक शेख ही दोन्हीही पायानं अपंग आहे. तरीही या मुलीनं आज मतदानाचा आपला हक्क बजावला.

७२ वर्षांचा ‘सदाबहार’ मतदार करतोय गळ्यात फ्लेक्स घालून मतदानाचं आवाहन

आज राज्यभर लोकशाहीचा जागर सुरु आहे. विधानसभेच्या जागांवर राज्यातील मतदार आपला कौल मतदानाच्या माध्यमातून नोंदवत आहे. या सर्वात सोलापूर मध्ये एक निराळं चित्र पाहायला मिळालं. नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकट करण्यासाठी एक ७२ वर्षीय सदाबहार मतदार मात्र पायाला भिंगरी लावून मतदान जनजागृती करतं आहे.

‘बुलेट चं उत्तर बॅलेट ने देऊया!’ – जिल्हाधिकारी गडचिरोली

नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून सर्वांना परिचित असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क वाजवला आहे. जर आपल्याला गडचिरोली जिल्हा नक्षल मुक्त करायचा असेल तर मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या “बुलेट चे उत्तर बॅलेट ने देऊया! चला मतदान करूया!” असे आवाहन सिंह यांनी केलं आहे.  

मुंढव्यात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस

आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी शांतपणे आणि शिस्तीत मतदान सुरू असताना काही ठिकाणी मात्र मतदानाला हिंसक स्वरूप आणि बोगसपणाचं गालबोट लागल्याचं निदर्शनास आलं आहे. करमाळा येथे दोन अपक्ष उमेदवारांच्या गटामध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर पुण्यातील मुंढवा परिसरात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदान स्लिपवर नाव आणि नंबर असतानाही, कुठल्याच ओळ्खपत्राची तपासणी न करता दुसरी महिला मतदान करून गेल्यामुळे मतदानाचा हक्क न बजावता येणाऱ्या महिलेने आपली खंत माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

सोलापूर मधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदान व्यवस्थित पार पडत आहे, तसेच नागरिकही मोठ्या उत्साहात मतदानाला जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु सोलापूर मधील सूतगिरणी परिसरात राहणाऱ्या सुमारे १ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधीना मतदान करूनही आपल्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत म्हणून हे पाऊल उचललं असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

भंडाऱ्यात मतदानाला सुरवात, १० लाख मतदार बजावणार हक्क

आज राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असून, सकाळी सात वाजल्यापासून राज्यात सर्वत्रच मतदानाला सुरवात झाली आहे. भंडारा जिल्हातील तीन मतदार संघात १ हजार २०६ मतदार केंद्र आहेत. तर या मतदार संघात एकूण ९ लाख ९१ हजार ८९० मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. नागरिकांना मतदान व्यवस्थित करता यावे तसेच कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५ हजार २०२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २ हजार ३७५ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

१०० टक्के मतदान झालं पाहिजे – मोहन भागवत

मतदानानंतर मोहन भागवत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांना निवडणुकीच्या मतदानाचे महत्व समजावून सांगितले आहे. तसेच १०० टक्के मतदान हे झाले पाहिजे असं देखील आवाहन केले आहे.