दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी ‘सुवर्ण संधी’!

दसऱ्याचा मुहूर्त साधल्यानंतर आता धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी लोकांची पुन्हा एकदा सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होणार आहे. दिवाळीच्या आधीच सोने खरेदी करणाऱ्यांना एक गोड बातमी मिळाली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना सोने खरेदी करता येऊ शकणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिल्लीत सोन्याच्या दरात ३० रुपयांची किरकोळ घसरण झाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

‘व्हाइट हाऊस’मध्ये दिवाळी! ट्रम्प दीपप्रज्वलन करून दिवाळीच्या उत्सवास सुरुवात करतील

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. दिवाळी सुरू होण्याच्या तीन दिवस आधीच दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसध्ये दिवाळी साजरी करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. याआधी २००९ पासून बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू केली होती. ट्रम्प हे गुरुवारी दीपप्रज्वलन करून दिवाळीच्या उत्सवास सुरुवात करतील. २०१७ मध्ये व्हाइट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात त्यांनी दिवाळी साजरी केली होती. उद्याच्या दिवाळी कार्यक्रमास त्यांच्या प्रशासनाचे सदस्य व भारतीय अमेरिकी समुदायाचे नेते उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेजसिंह सरना यांना दिवाळीसाठी निमंत्रित केले होते. सध्या अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांनी दिवाळीचा उत्सव सुरू केला आहे.

‘रंगात रंगलेली – फोटोजेनिक दिवाळी’

दिवाळी म्हटलं की रंगीबेरंगी वातावरणाचा सडा सगळीकडे पडलेला दिसतो. तो रंग कपड्यांमध्ये, दिवाळी फराळात आणि आकाशकंदिलामध्ये दिसून येतो. रंगीबेरंगी रांगोळीमुळे बाह्य वातावरण अधिक प्रसन्न होतं. त्यामुळे या रंगांकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही..!!

यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट; बाजारपेठा सामानाने फुल्ल पण लोकांविना शांतच..

यंदा पावसाने राज्यभरात कहर माजवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने आतापर्यंतचं सर्वाधिक रौद्ररूप दाखवलं असून याचा परिणाम दिवाळी सणावरही होईल असं दिसून येत आहे. मागील ५ दिवसांपासून पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, अहमदनगर या ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. घराबाहेर पडण्यासाठी पाऊस जराही उसंत देत नसल्याने याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम दिसून येत आहे. या आठवड्याच्या शेवटी वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीला सुरुवात होणार असून, या सणावरही पावसाचे सावट जाणवून येत आहे.

यंदा दिवाळी फराळ महागात जाणार ! डाळीचे भाव भडकण्याची शक्यता

अतिरिक्त व लांबलेल्या पावसाचा यंदा तूर डाळ वगळता सर्वच डाळींना फटका बसला आहे. हरभरा डाळीच्या किमती वाढत असल्याने ऐन दिवाळीत लाडू महागणार आहे. एकूणच यंदा दिवाळीचा फराळ सर्वसामान्यांसाठी महाग असेल, असे चित्र आहे. दिवाळीतील फराळ तयार करण्यासाठी प्रामुख्याने विविध डाळींचा उपयोग होतो. हरभरा डाळीच्या बेसनापासून तयार केला जाणारा लाडू खवय्यांच्या मोठ्या पसंतीचा असतो. यामुळे त्याची मागणी सर्वाधिक असते. मात्र आता बाजारात हरभरा डाळ व बेसनाच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. पण त्या तुलनेत पीक कमी असल्याने पुढील आठवडाभरात हरभरा डाळीचे भाव भडकण्याची शक्यता आहे