जमिन विकत घेताना काय काळजी घ्यावी? कोणत्या गोष्टी तपासणे आहे अत्यंत गरजेचे? जाणुन घ्या

कायद्याचं बोला #8 | अॅड. स्नेहल जाधव

अनेकदा लोक कुठल्याच गोष्टींची पडताळणी न करता जमीन घेतात आणि नंतर मग त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कोर्टाची पायरी चढावी लागते. त्यामुळे जमिनी/जागा विकत घेताना कुठलीही काळजी न घेता जमीन घेऊन नंतर मग काही समस्या निर्माण झाल्यावर वकीलाकडे जाण्यापेक्षा जमीन घेतानाच एखाद्या चांगल्या वकिलांचा सल्ला घ्यावा. कारण त्यामुळे तुमचा खर्च व मनस्ताप दोन्हीही वाचेल.

तर जमीन घेताना कुठली काळजी घ्यायची हे आपण आजच्या सदरात पाहणार आहोत….

१) जमिनीवर कोणत्याही बँक किंवा तत्सम व वित्तीय संस्था इत्यादींचा कोणत्याही प्रकारचा बोजा नाही ना याची खात्री करावी. एखादा न्यायालयीन खटला चालू असेल तर त्या बाबतीतले संदर्भ तपासून पाहावेत. यासाठी वकिलाचा सल्ला घेणे चांगले असते.

२) जमीन विकत घ्यायची आहे, तर मग त्या जमिनीत किती मालक आहेत, जमिनीवर कर्ज घेतले आहे का, जमीन कोणत्या प्रकारची आहे, जमिनीच्या इतर हक्कातील नोंदी, इ. अतिमहत्त्वाची माहिती तलाठी कार्यालय येथे उपलब्ध असते. त्याकरिता संबंधित जमिनीचा ७/१२ चा उतारा काढून बारकाईने तपासावा लागतो म्हणजे सविस्तर माहिती मिळते.

३) ७/१२ वर असलेले जमिनीचे क्षेत्रफळ आणि प्रत्यक्षात असलेले क्षेत्रफळ तपासणे आवश्यक ठरते कारण जमिनीची किंमत मोजावी लागते. खरेदीचा व्यवहार प्रत्यक्ष मालकाशी करणे उत्तम असते. जमिनीस कूळ आहे की नाही, जमीन नवीन शर्तीची, इनामाची, वतनाची आहे की कसे काय, ७/१२ च्या उता-यावर काही शेरा मारलेला आहे की काय, सदर जमीन स्वकष्टार्जित आहे की एकत्रित कुटुंबाची आहे, हे सर्व तपासावे लागते. एकत्रित कुटुंबाची असल्यास ७/१२ वर नावे असलेल्या व्यतिरिक्त आणखी कोणी हक्क सांगू शकणारे आहेत का, एकत्रित कुटुंबातील सर्वाची जमीन विक्रीस संमती आहे का, जमीन विकणा-यास कुणी बहीण, मुली आहेत का, हेही पाहणे आवश्यक आहे. खरेदी करीत असलेल्या जमिनीच्या ७/१२ उता-यावर असलेल्या नोंदीप्रमाणे प्रत्यक्षात फळझाडे, विहीर, बोअर इत्यादी तपासून खातरजमा करावी लागते.

यासाठी एखाद्या चांगल्या वकीलाचा सल्ला घेणे योग्य ठरते…कारण नेहमी लक्षात ठेवायचं की “prevention is better than cure!”

सूचना – वरील विषयाबाबत किंवा शेत-जमिनीबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा पुढच्या भागात त्यावर माहिती देण्याचा प्रयत्न असेल…

– अ‍ॅड. स्नेहल जाधव
(लेखिका व्यवसायाने वकिल असून त्या कायदादूत संस्थेच्या संस्थापक आहेत)