तालिबानकडून पाकिस्तानी रुपयामध्ये व्यापार करण्यास नकार, म्हणाला -“आम्ही आमचे हित नक्कीच बघू”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानला मदत केल्यानंतर पाकिस्तानला आता तेथील अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवायचे आहे. पाकिस्तानने तालिबानसोबत पाकिस्तानी चलनात द्विपक्षीय व्यापार करण्याची घोषणा केली. मात्र, तालिबानने पाकिस्तानची ऑफर नाकारली आहे. तालिबानने म्हटले की,” ते त्यांचे हित लक्षात घेऊनच निर्णय घेतील, कारण हा त्यांच्यासाठी सन्मानाचा प्रश्न आहे.”

पाकिस्तानचे केंद्रीय अर्थमंत्री शौकत तारिन यांनी गुरुवारी सांगितले की” त्यांच्या सरकारने अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानी चलनात व्यापार करण्याचा निर्णय घेतला आहे.” तारिन म्हणाले की,” अफगाणिस्तानमध्ये डॉलरची कमतरता आहे. म्हणूनच पाकिस्तान स्वतःच्या चलनात व्यापार करेल.” तीन दिवसांच्या शांततेनंतर तालिबान्यांनी त्यास प्रत्युत्तर दिले.

तालिबानचे नेते आणि अहमदुल्लाह वासिक यांनी वृत्तसंस्थेला सांगितले- “आम्हाला हे स्पष्ट करायचे आहे की, परस्पर व्यापार फक्त आमच्या चलनात म्हणजेच अफगाणीमध्ये केला जाईल. चलन बदलले जाणार नाही. आम्हाला आमच्या ओळखीचे महत्त्व समजते. यात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही.”

शौकत तारीन गेल्या आठवड्यात म्हणाले- “अफगाणिस्तानमध्ये अजूनही डॉलरची समस्या आहे. अमेरिकेने 9 अब्ज डॉलर्सचा फंड रोखला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि आपण मिळून पाकिस्तानी रुपयांमध्ये व्यवसाय केला तर ते अधिक चांगले होईल. त्यासाठी चलन रूपांतरित करण्याचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो.”

ऑगस्टमध्ये पाकिस्तानी रुपयाची किंमत एका डॉलरच्या तुलनेत 164 रुपये होती. आता ती जवळजवळ 169 आहे. काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ,अफगाणिस्तानातून तस्करीद्वारे पाकिस्तानात बऱ्याच गोष्टी येतात आणि यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसतो.

तालिबानने पाकिस्तानची ही ऑफर नाकारली
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने काबूल विमानतळाचे नूतनीकरण करून त्याचे कामकाज सुरू करण्याची ऑफर दिली होती. तालिबाननेही ही ऑफर नाकारली आहे. तालिबानने हे काम तुर्की आणि कतारला दिले आहे. यानंतर पाकिस्तानने तालिबानला प्रशासनात मदत करण्याची ऑफर दिली. तालिबानने हे सांगत ही ऑफर देखील फेटाळून लावली की, ते स्वतःच्या इच्छेनुसार काम करतील.

Leave a Comment