‘टार्झन’ने घेतला जगाचा निरोप! अभिनेता जो लारा यांचा पत्नी ग्वेनसह विमान अपघातात मृत्यू

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। १९९० च्या दशकात ‘टार्झन’ या टीव्ही मालिकेत टार्झनची मुख्य भूमिका निभावून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता विल्यम जोसेफ लारा यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या शनिवारी विमान क्रॅश होऊन झालेल्या या दुर्दैवी अपघातात ५८ वर्षीय जो, त्यांची पत्नी ग्वेन यांच्यासह अन्य पाच जण ठार झाले आहेत. जो यांच्यासह इतर ६ जण एका छोट्या जेटमधून प्रवास करत होते. हा अपघात नॅशविलेजवळील टेनेसी सरोवरात विमान कोसळून झाला. याप्रकरणी पोलिस सखोल तपास करत आहेत.

 

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, ब्रॅंडन हाना, ग्वेन एस. लारा, विल्यम जे. लारा, डेव्हिड एल. मार्टिन, जेनिफर जे. मार्टिन, जेसिका वॉल्टर्स आणि जोनाथन वॉल्टर्स अशी विमान अपघातात ठार झालेल्या लोकांची नावे आहेत. तर हे सर्वजण टेनेसी येथील ब्रेंटवुडचे रहिवासी आहेत. सध्या पोलिस जो यांच्यासह इतर सहा जणांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. रविवारी (काल) रदरफोर्ड काउंटी फायर रेस्क्यूचे कॅप्टन जॉन इंगल यांनी सांगितले की, स्मिर्नाजवळील पर्सी प्रिस्ट लेक येथे शोध मोहीम सुरु आहे. तलावाच्या सभोवतालच्या भागात पसरलेल्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या भागांची तपासणी केली जात आहे.

टार्झन ही एक अमेरिकन लोकप्रिय मालिका होती. ज्याचा एक सिझन १९९६ ते १९९७ दरम्यान प्रसारित झाला होता. या मालिकेत टार्झनच्या जंगलातून मानवी संस्कृतीत जाण्याची आणि लग्न करण्याची रंजक कहाणी दर्शविली गेली होती. दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी रिसॉर्ट येथे या मालिकेचे चित्रीकरण केले होते. जो लारा यांचा जन्म २ ऑक्टोबर १९६२ रोजी सॅन डिएगो येथे झाला. त्यांनी मॉडेलिंगद्वारे आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. पुढे त्यांना टार्झनमध्ये मुख्य भूमिका मिळाली.

जो यांनी टार्झन मालिकेच्या २२ भागांमध्ये आपली अभिनय शैली दर्शविली. जो अमेरिकन सायबोर्ग स्टील योद्धा, स्टील फ्रंटियर, वॉरहेड, डूम्सडे, आणि टार्झन व्यतिरिक्त टीव्ही शो बेवॉच आणि कोनान द अ‍ॅडव्हेंचरर यांमध्ये झळकले होते. त्यांना याअगोदर २०१८साली ‘समर ऑफ ६७’ या चित्रपटामध्ये शेवटचे बघितले होते. जो एक अभिनेता तर होतेच, पण त्याशिवाय परवानाधारक फाल्कनर, पायलट, ओपन-वॉटर डायव्हर, सर्फर, बॉक्सर आणि प्रशिक्षित नेमबाजदेखील होते.