डाॅक्टर, पोलिसांबरोबरच शिक्षकही कोरोना विरोधात मैदानात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | यंदाच्या शिक्षक दिनी यशवंत हायस्कुल, कराड येथे शहरातील आठ कोरोना योद्ध्यांचा सम्मान सोहळा पार पडला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील डी डी सर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य आणि विद्यालयातील सर्व सहकारी ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी यशवंत हायस्कुलच्या आठ कोरोना योध्याचा सम्मान करण्यात आला, विद्यालयातील मी श्री शिकलगार एस ए, श्री चव्हाण, श्री वानखेडे ए एस, श्री शिवदास ए एम , सौ थोरवडे मॅडम, सौ मुळे मॅडम, शेट्टीगार मॅडम आणि हुलवान मॅडम या सर्व कोरोना योद्धयानी दि 24 एप्रिल 2020 ते 16 मे अखेर कराड शहरातील वेगवेगळ्या वॉर्ड मधील प्रत्येकी 100 कुटुंबाचा आरोग्य सर्वेक्षण केले. संपूर्ण देश lock down असताना तालुक्यातील इतर अनेक शिक्षकांच्या बरोबरीने आमचे काम सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे जाणवत असताना पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सरकारी यंत्रणा मात्र देशवासीयासाठी अहोरात्र लढत होते. त्यांना पाहिल्यानंतर एक वेगळा अभिमान वाटायचा, आणि तीच संधी आम्हाला मिळाली. एक वेगळा अविस्मरणीय अनुभव मिळाला अशा शब्दांत यावेळी सदर सन्मानमुर्तींनी आपली भावना व्यक्त केली.

यावेळी, सर्व्हेचे काम सुरू झाले, रोज प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन त्यांच्या आरोग्याचा रिपोर्ट वरिष्ठांकडे करणे, हे आमचं काम, खरतर घरातून जाताना एक अनामिक भीती ही वाटायची, परत येताना कुटुंबातील सदस्यांना आपल्यामुळे काही बाधा होईल का अशी काळजीही वाटायची, दररोज माझ्या विद्यालयाचे सहकारी आम्ही चर्चा करायचो, प्रत्येक जण प्रामाणिकपणे आपले काम करत होते, आपणाला यानिमित्ताने समाजाची सेवा करण्याचे भाग्य लाभले हा अभिमान वेगळा होता.

एक दिवसाचा प्रसंग, माझ्या भागामध्ये साधारणतः मजुरी करणारी वीस कुटुंबे होती, स्वतःच घर नाही, साठविलेले पैसे संपलेले, मदतीसाठी ते कोणाकडे पोहचू शकले नव्हते, त्यामुळे त्यांना कसलीही मदत मिळालेली नव्हती, एक दिवस मी त्यांच्याकडे आरोग्याची चर्चा करत असताना त्यांचे उत्तर ऐकून सुन्न झालो. यशवंत हायस्कुलचे सर हा वेगळा आदर मला त्यांच्याकडून मिळत होताच. त्यांनी मन मोकळं केलं. एक महिला म्हणाली, सर, कोरोना नं कुणी मरणार नाही, आता आम्ही उपसमारीनच मरु, काही मदत मिळाली तर बघा” माझ्याकडं उत्तर नव्हतं, 20 कुटुंब होते, त्यात लहान मुलंही होती. मार्ग सुचत नव्हता, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री यशवंत डांगे साहेबानी अडचण आल्यास फोन करण्यासाठी नंबर दिला होता. सहजच त्यांना या कुटुंबाच्या अवस्थेबद्दल मेसेज केला. त्यांनी लगेच मला कराड नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले. सहजच केलेला प्रयत्न यशस्वी होताना दिसत होता. विलंब न करता नगरपालिकेतील श्री इखलास शेख आणि दुसरे एक अधिकाऱ्यांना भेटलो. परिस्थिती सांगितली, 20 कुटुंबाची यादी दिली, तेवढी मदत शक्य नव्हती.

शहरातील दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून मदत गोळा केली जात होती. 10 कुटुंबाला त्यांच्या माध्यमातून राशन मिळालं. त्यांना मी स्वतः पोहोच केलं पण अजून 10 कुटुंबं अपेक्षेने पहात होती, या उरलेल्या कुटुंबाला मी धान्य वाटप केले, जेव्हा ही सर्व मदत त्यांना दिली जात होती त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील माझ्याप्रतिच्या भावना ज्या मी पहिल्या त्या मी शब्दात नाही सांगू शकत, माझ्यासाठी निश्चित एक वेगळं काम आपल्या हातून घडल्याचं समाधान आयुष्यभर टिकणार होतं. वास्तवीक ज्या कामासाठी माझी निवड झाली होती त्याचा आणि या मदतीचा काहीही संबंध नव्हता. पण मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी, रयतमध्येच सेवा करतो, समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेतून काहीतरी करू शकलो एवढा आनंद पुरेसा आहे.

Leave a Comment