विशेष प्रतिनिधी । दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेसला १९ ऑक्टोबरला तीन तासांहून अधिक विलंब झाल्याने आयआरसीटीसीला १.६२ लाखांचा भूर्दंड बसला आहे. रेल्वेची उपसंस्था असलेल्या आयआरसीटीसीला याप्रकरणी विमा कंपन्यांच्या माध्यमातून ९५० प्रवाशांना भरपाई देण्यास सांगण्यात आले होते. भारतीय रेल्वेच्या इतिहासात गाडीच्या विलंबापोटी प्रवाशांना भरपाई मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तेजस एक्स्प्रेस ही १९ ऑक्टोबरला लखनौ येथून सकाळी ९.५५ वाजता सुटली होती, पण ती सकाळी ६.१० वाजता सुटणे अपेक्षित होते नंतर ही गाडी नवी दिल्लीला १२.२५ वाजता पोहोचणे अपेक्षित असताना ३.४० वाजता पोहोचली. ती नवी दिल्लीहून ३.३५ ला सुटण्याऐवजी सायंकाळी ५.३० वाजता सुटली. लखनौला रात्री १०.०५ वाजता पोहोचणे अपेक्षित असताना रात्री ११.३० वाजता पोहोचली.
लखनौ ते दिल्ली दरम्यान गाडीत जे ४५० प्रवासी होते त्यांना भरपाई म्हणून प्रत्येकी २५० रुपये मिळणार आहेत. दिल्ली ते लखनौ दरम्यान ५०० प्रवासी होते, त्यांना प्रत्येकी शंभर रुपये भरपाई मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या प्रवाशांना विमा कंपनीच्या लिंकवरून भरपाई मिळेल. तेजस एक्स्प्रेसच्या तिकिटावर ही लिंक दिलेली आहे.” १९ ऑक्टोबर रोजी कानपूर येथे दुसरी एक रेल्वे रूळावरून घसरल्याने तेजस एक्स्प्रेसला विलंब झाला होता.