उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील मस्सा (ख.) शिवारात कडब्याच्या गंजीत लपवून ठेवलेली अंदाजे सव्वा कोटीची गांजाची दहा पोती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून दुपारी चार वाजेच्या सुमारास जप्त केली. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
31 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळंब तालुक्यातील मस्सा शिवारात कडब्याच्या गंजीला विक्रीसाठी गांजाची पोती ठेवली असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या टीमने मस्सा शिवारात एकाच्या शेतीतील कडब्याच्या गंजीला दडवून ठेवलेला दहा पोती अंदाजे सव्वा कोटीचा गांजा पकडला आहे. गांजाची पोती जप्त करून कळंब पोलिस ठाण्यात रात्री आठ वाजेच्या सुमारास आणण्यात आली आहेत.
किती किलो गांजा आहे, याची मोजणी उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल चव्हाण, सॅन सैय्यद, बबन जाधवर, अविनाश मरल्लपले यांनी केली. दरम्यान,गांजा कुठून आणण्यात आला, कुठे विक्री करणार बाबतची माहिती पोलिस घेत असून रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.