भाडेकरु पती पत्नीचा घरमालकाच्या दागिन्यांवर डल्ला; घरात कोणी नाही पाहून केला कार्यक्रम, पण..

लोणंद : घरात कोणी नाही हे पाहून भाडेकरु पती पत्नीने घरमालकाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार सातारा जिल्यातील लोणंद येथे घडला. लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील रहिवाशी अशोक अनंत महामुनी यांचेकडे गेली 1 महिन्यापासून भाडेकरु म्हणून राहणारे पती पत्नीने घरमालक घरात नसलेचे पाहुन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवून रुम खाली करुन पळून गेलेबाबत फिर्यादी अशोक महामुनी यांनी लोणंद पोलीस ठाणेत चोरीची तक्रार दाखल केली होती. लोणंद पोलिसांनी सदर आरोपींना शोधून काढले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

लोणंद पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक व पोलीस स्टाफ यांना मिळाले माहितीच्या आधारे यातील आरोपी पती-पत्नी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी केली. त्यावेळी नमूदच्या गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले चार तोळे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. यातील आरोपी पती-पत्नी नवनीत नाईक आणि प्रिया नाईक (दोन्ही, रा. भांडुप मुंबई) हे बंटी बबली या नावनेही परिचित असून त्यांचेवर यापुर्वी सांगली, कोल्हापुर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नवी मुंबई, जालना, नगर, वाशिम, नागपूर या जिल्ह्यात घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत अशी आहे की, हे पेईंग गेस्ट म्हणून ज्या ठिकाणी रहातात तेथील शेजार्‍यांशी मैत्री वाढवुन शेजारी किंवा घरमालक बाहेरगावी गेले असता संधी साधून संशयित घरफोडी, चोरी करत होते.

पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल व फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर, पोलीस उपनिरिक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो. ना. संतोष नाळे, श्रीनाथ कदम, तसेच स. फौ. शिकलगार, हवालदार गार्डे, महेंद्र सपकाळ, बी. के. पवार, पो. कॉ. शशिकांत गार्डी, अविनाश शिंदे, गोविंद आंधळे, केतन लाळगे, विठ्ठल काळे, महिला पोलीस प्रिया दुरगुडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

You might also like