Monday, February 6, 2023

आज 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे होणार उद्धाटन

- Advertisement -

औरंगाबाद – 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास होणार आहे. यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रांगणातील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी सज्ज झाली आहे.

देगलूर येथील ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनात पहिल्या दिवशी संत जनाबाई व्यासपीठावर उद्घाटनाचा सोहळा तीन तास चालणार आहे. त्यानंतर याच व्यासपीठावर निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता शून्यावर आली आहे’ या विषयावर पहिला परिसंवाद होणार आहे. यात नंदकिशोर पाटील, संजय आवटे, अलका धुपकर, रवींद्र केसरकर, वैजनाथ अनमुलवाड सहभागी होतील. त्याच वेळी दुसऱ्या प्र.ई. सोनकांबळे व्यासपीठावर सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ‘आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर’ या विषयाचे परिसंवादाचे दुसरे पुष्प सुरू होईल. यात दीपा क्षीरसागर, राम रौनेकर, रवींद्र बेंबरे, संजय जगताप आणि मोहिब कादरी हे सहभागी होणार आहेत. नंतर रात्री सात ते नऊ दरम्यान संत जनाबाई व्यासपीठावर ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. दरम्यान सकाळी साडेनऊ वाजता मावळते अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते श्याम देशपांडे ग्रंथनगरीत ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेंद्र करपे यांनी सांगितले.

- Advertisement -

या संमेलनात कोरोना संबंधी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असून, मास्क शिवाय या सभागृहात प्रवेश देण्यात येणार नाही. शारीरिक अंतर राखणे बंधनकारक केले असून, दोन्ही सभागृहे आणि परिसराचे निर्जंतुकीकरण केले आहे. सभागृहात शारीरिक अंतर राखले जाईल अशा प्रकारची शासन व्यवस्था करण्यात आली असल्याचे संमेलनाचे मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण यांनी सांगितले.