औरंगाबाद | शहरातील न्यू हनुमान नगरात जुन्या भांडणातून पाच जणांनी तरुणाची भररस्त्यावर लोखंडी रॉड, चाकूने भोसकत आणि दगडाने ठेचून त्याची रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास निर्घूण हत्या केली. क्रूरतेचा कळस म्हणजे मारहाण सुरु असताना मदतीसाठी ओरडणाऱ्या तरुणाच्या तोंडात निर्दयी गुंडांनी माती कोंबली. तसेच त्याच्या तोंडावर लघुशंका करुन त्याचा व्हिडीओ काढून मारेकरी पसार झाले होते. दरम्यान, या पाचही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पुंडलिक नगर पोलिसांनी सर्वांचे मोबाईल जप्त करून सायबर पोलिसांकडे डेटा रिकव्हर करण्यासाठी पाठवले असल्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मंगळवारी सांगितले.
याविषयी अधिक माहिती अशी की, आकाश रुपचंद राजपूत (२१, रा. अजिंक्यनगर, गारखेडा परिसर) हा सागर केशभट या मित्रासोबत फर्निचरची कामे करायचा. दोन दिवसांपुर्वी कुख्यात गुन्हेगार गणेश रविंद्र तनपुरे (१९, रा. गल्ली क्र. २, न्यू हनुमाननगर) याचे आकाशच्या मित्रासोबत हुसेन कॉलनीत भांडण झाले होते. त्यावेळी तेथ सागर देखील उपस्थित होता. त्याचा राग गणेशच्या मनात खदखदत होता. रविवारी रात्री सागर आणि आकाश दिसताच त्याने दोघांना गल्लीत अडवले. तनपुरेची परिसरात दहशत असल्यामुळे त्याला पाहून सागर तेथून पळून गेला. मात्र, त्याने आकाशला पकडून ठेवले. आकाशने आरडाओरड सुरु करताच तेथे गणेशचा भाऊ ऋषीकेश रविंद्र तनपुरे (२१), मेव्हणा राहुल युवराज पवार (२४) आणि संदीप त्रिंबक जाधव (४५, मुळ रा. आंबेडकरनगर) धावत आले. त्यांनी आकाशला ओढतच बाजुला असलेल्या त्यांच्या घराच्या दिशेने नेले. तेथे लोखंडी रॉडने मारहाणीला सुरुवात केली. त्याच्या पायाच्या नळ्या, दोन्ही गुडघे आणि डोके फोडले. आकाश जमिनीवर कोसळताच गणेशची आई मंगल रविंद्र तनपुरे (४०) हिने त्याला दगडाने मारले. तर गणेश आणि ऋषीकेशने चाकूने भोसकले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आकाश टाहो फोडून नागरिकांकडे मदतीसाठी याचना करु लागला.
पण या गुन्हेगारांनी त्याच्या तोंडात माती कोंबली. त्यामुळे त्याचा आवाजही बाहेर निघत नव्हता. जवळपास दहा मिनिटे हा भयानक थरार सुरु होता. मात्र,गुंडांच्या दहशतीमुळे तेथे नागरिक केवळ बघ्याच्या भूमिकेत उभे होते. दरम्यान, तेथून मारेकरी पसार झाल्यानंतर पुंडलिकनगर पोलीस दाखल झाले. मध्यरात्री पाचही आरोपींना अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.