Thursday, March 30, 2023

हैतीच्या राष्ट्रपतीची घरात घुसून हत्या, अमेरिकन एजंट म्हणून आले होते हल्लेखोर

- Advertisement -

हैती । कॅरेबियन देश हैतीचे अध्यक्ष ज्वनेल मोसे (Jovenel Moise) यांची बुधवारी त्यांच्या राहत्या घरी हत्या (Murder) करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या हत्येप्रकरणी चार संशयित हल्लेखोर सुरक्षा दलाने ठार केले तर अन्य दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस प्रमुख लिओन चार्ल्स म्हणाले,”उर्वरित हल्लेखोरही लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील. मोसे 53 वर्षांचे होते. बीबीसीच्या वृत्तानुसार, काही अज्ञात बंदूकधारकांनी हैतीची राजधानी पोर्ट-औ-प्रिन्स येथील बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता अध्यक्ष मोसे यांच्या घरात घुसून मोसे यांना गोळ्या घालून ठार केले. या हल्ल्यात हैतीच्या फर्स्ट लेडी मार्टिन मोसे आणि अध्यक्ष ज्वनेल मोसे यांच्या पत्नीही जखमी झाल्या. त्यांना फ्लोरिडा येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिस प्रमुख चार्ल्स यांनी बुधवारी एका दूरध्वनी भाषणात सांगितले की,”सुरक्षा दलाने चार हल्लेखोर ठार केले आहे तर दोघे आमच्या ताब्यात आहेत. ओलीस घेतलेल्या तिन्ही पोलिसांची प्रकृतीही आता स्थिर आहे. हल्लेखोरांनी राष्ट्रपतींचे घर सोडल्यानंतर वाटेत पोलिसांशी चकमक झाली. मोसे 2017 मध्ये हैतीचे अध्यक्ष झाले. अलीकडेच त्यांच्या राजीनामा देण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने झाली. गटबाजी, राजकीय अस्थिरता, सामूहिक युद्ध हिंसाचार आणि नैसर्गिक आपत्ती यांनी हैती हा गरीब देशांपैकी एक बनविला आहे.

- Advertisement -

देशाचे अंतरिम पंतप्रधान क्लेड जोसेफ यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. जोसेफ म्हणाले,”हल्लेखोर परदेशी असून त्यांना इंग्रजी आणि स्पॅनिश भाषा माहित होती.” हैतीच्या अधिकृत भाषा क्रिओल आणि फ्रेंच आहेत. अनेक अहवालात असे म्हटले आहे की,” काहीजणांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते आणि अमेरिकन ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीचे असल्याचे भासवले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.” अमेरिकेतील हैतीचे राजदूत बोचित एडमंड यांनी सांगितले की,” हा हल्ला अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट एजंटांनी केलेला नाही.” ते म्हणाले की,” हा हल्ला सुपारी देऊन करण्यात आला आहे.” एडमंड यांनी नंतर रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की,” हल्लेखोरांनी अमेरिकेचे एजंट म्हणून राष्ट्रपतींच्या घरात प्रवेश केला असणार.”

Jovenel Moise यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करावा लागला. या वर्षाच्या सुरूवातीस राजधानीसह अनेक शहरांमध्ये त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. ऑक्टोबर 2019 मध्ये लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या पण वादामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. मोसे डिक्री द्वारे सत्तेत राहिले होते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा विरोधी पक्षांनी मोसे यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली तेव्हा त्याच दिवशी त्यांची हत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. हैतीची लोकसंख्या 1.1 कोटी असून त्यातील 60 टक्के लोकं दारिद्र्य रेषेखालील आहेत. 2010 च्या भूकंपात हैतीमध्ये 2 लाख लोकं ठार झाले. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान केले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group