पुण्यात फडकला महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आझादी का अमृतमहोत्सव’च्या औचित्याने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील बाणेर येथे ‘नेटसर्फ नेटवर्क’च्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. १२० फूट बाय ४० फूट इतक्या भव्य आकाराचा तिरंगा ध्वज ‘नेटसर्फ’ने आपल्या मुख्य कार्यालयाला लावत राष्ट्राला विक्रमी सलामी दिली आहे.

हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तिरंग्यांपैकी एक आहे. या भव्य तिरंगा ध्वजाचे अनावरण राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नेटसर्फ नेटवर्कचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सुजित जैन, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. एस के जैन, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, पुनीत जोशी, संदीप खर्डेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, या अनोख्या पद्धतीने राष्ट्राला वंदन करण्याचा नेटसर्फ नेटवर्कचा प्रयत्न स्तुत्य आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत असून, भारतीयांच्या कल्पकतेने ‘हर घर तिरंगा’ या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे, याचा आनंद वाटतो अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केलं.