संतापजनक ! जन्मदात्या पित्यानेच घेतला तीन महिन्याच्या चिमुकलीचा प्राण

जालना – कुटुंबात किरकोळ कारणावरून दुसऱ्या व्यक्तीला खूनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जन्मदात्या पित्यानेच आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री मंठा तालुक्यात उघडकीस आली. स्नेहा अविनाश जाधव (3 महिने) असे मृत मुलीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. गुरुवारी रात्री केहाळ वडगाव येथे अविनाश चव्हाण यांनी ज्योती रणवीर व तिची आई पंचफुलाबाई यांच्याशी वाद घातला. ही बाब ज्योती व तिची आई पंचफुलाबाई यांनी घरच्यांना सांगितली. त्यानंतर या महिलांच्या घरातील नातेवाईक अविनाश ला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी संशयित अविनाशने जाब विचारणार यांना अद्दल घडविण्यासाठी व त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वतःच्या तीन महिन्यांच्या मुलीला निर्दयीपणे जोरात जमिनीवर आपटले. त्यामुळे स्नेहाच्या डोक्याला जबर मार लागला व ती जागीच मरण पावली.

गावातील नागरिकांनी तात्काळ स्नेहाला उपचारासाठी मंठा येथे नेले असता तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like