सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा तालुक्यात शेवटच्या टोकावर असलेला पर्यटकांचे आकर्षण असलेल्या प्रसिध्द केळवली धबधब्यात शुक्रवारी दि. 23 रोजी बुडालेला युवकाचा मृतदेह अखेर चार दिवसांनी सापडला आहे. सातारा शहरातील वायसी काॅलेजचा बारावीत शिकत असलेला विद्यार्थी आपल्या मित्रासमवेत आल्यानंतर तो बुडाला होता. राहुल सुभाष माने (रा. विकासनगर, सातारा) असे मृतदेह सापडलेल्या युवकाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साताऱ्यातील चार मित्र केळवली धबधबा पाहण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गेले होते. राहूल माने आपल्या मित्रांसोबत धबधब्यात पोहोत असताना, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मित्रांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्रांना राहूल याला वाचविण्यात यश आले नाही. दरम्यान, दि. 23 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनास्थळी सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.
धबधब्याच्या पाण्यात बुडालेल्या राहुल मानेला शोधण्यासाठी ग्रामस्थ, पोलीस आणि रेस्क्यू टीम कसोशीने प्रयत्न करत आहे. शनिवारी सकाळी शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहिम सुरू करण्यात आली. परंतु रविवारी पुन्हा पावसाची संततधार जोरदार सुरू होती. त्यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. शुक्रवारपासून शोध सुरू असलेल्या राहूल माने यांचा मृतदेह आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास केळवली धबधब्यापासून 70 फूट अंतरावर सापडला आहे. स्थानिक पोलिस पाटील व ग्रामस्थांना आज राहूलचा मृतदेह आढळून आला.