Monday, January 30, 2023

धक्कादायक!! उसाच्या ट्रॅक्टरसह चालक विहिरीत बुडाला

- Advertisement -

सातारा | कऱ्हाड तालुक्याच्या वडोली निळेश्वर या गावात विचित्र घटना घडली. या ठिकाणी सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या दुर्घटनेत चालक विहिरीत बुडाला असून, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. हणमंत पांडुरंग झोंबरे (वय ३५, रा. बीड) असे चालकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वडोली निळेश्वर येथील शेतकरी बाबासाहेब संपत पवार यांच्या शेतातील उसाला जयवंत शुगर कारखान्याची तोड आली होती. हणमंत झोंबरे हा ट्रॅक्टरसह त्याठिकाणी ऊसतोडणीला गेला होता. ऊसतोडणी झाल्यानंतर ट्रॉलीमध्ये ऊस भरून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हणमंत कारखान्याकडे जाण्यासाठी निघाला. वडोली-करवडी रस्त्यानजीक दावणी शिवारात विहीर आहे. ट्रॅक्टर विहिरीजवळ आला असताना अचानक ट्रेलर विहिरीच्या काठावरून घसरला. त्यामुळे हणमंतचा ताबा सुटून ट्रॅक्टर उसाने भरलेल्या ट्रॉलीसह सुमारे पन्नास फूट खोल विहिरीत कोसळला. यावेळी शेतकऱ्यांनी आरडाओरडा केला. मात्र, ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत अक्षरश: गायबच झाला. त्यामुळे कोणाला कसलीच मदत करता आली नाही. चालक हणमंत हा विहिरीत बुडाला.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उदय दळवी, हवालदार डी. बी. राजे, गणेश बाकले आदी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. ट्रॅक्टर, ट्रॉलीसह मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्यांनी कऱ्हाडच्या पाणबुड्यांना घटनास्थळी पाचारण केले. तसेच जेसीबीही बोलविण्यात आला. सायंकाळी उसाने भरलेली ट्रॉली आणि ट्रॅक्टर विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. रात्री उशिरापर्यंत चालकाचा शोध सुरू होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’