सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी लोणंदनगरीमध्ये आगमन झाले. लोणंद नगर पंचायत आणि लोणंदकरांच्या वतीने भक्तिमय वातावरणात उत्साही स्वागत करण्यात आले. लोणंदच्या पालखी तळावर माऊलींची पालखी सजवलेल्या ओट्यावर ठेवण्यात आली. मुक्कामानंतर आज पालखी तरडगावकडे मार्गस्थ होणार आहे.
दोन दिवसापासून भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोणंदमध्ये एकच गर्दी केली होती. तरडगाव या ठिकाणी सोहळा दाखल होण्याआधी पुरातन ‘चांदोबाचा लिंब’ या ठिकाणी सोहळ्यातील अश्वांचे पाहिले उभे रिंगण आज पार पडणार आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी आज दाखल होत आहेत.
दरम्यान, पालखी मार्गावर आरोग्य विभागाकडून 21 स्थायी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. संर्पदंश, कुत्रे चालवण्यानंतरची लस, कोविड लसही वारकऱ्यांसाठी आरोग्य पथकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पहिल्याच दिवशी साडेचार हजार वारकऱ्यांवर उपचार
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम जिल्ह्यात 6 दिवस आहे. या मुक्काच्या कालावधीत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना जाग्यावरच औषधोपचार केले जात आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काल लोणंद येथे मुक्कामी आला असून या पहिल्याच दिवशी साडेचार हजार वारकऱ्यांवर औषधोपचार करण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार यांनी दिली आहे.