माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. चेतना सिन्हा यांना 2021 सातारा भूषण पुरस्कार जाहीर

सातारा | गेली अनेक वर्षे महिला सबलीकरण काम करणाऱ्या व सामाजिक कार्यकर्त्या माणदेशी महिला सहकारी बँक व माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. चेतना सिन्हा यांना रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांतर्फे दिला जाणारा मानाचा सातारा भूषण पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आला आहे.

म्हसवड येथील महिलांना सक्षम करण्यासाठी बँक स्थापनेचा विचार करून त्यांनी तसा प्रयत्न सुरू केला. अनेक अडचणींवर मात करून महिलांना संघटित करून शेवटी 1997 ला माणदेशी महिला बँक स्थापन झाली. डेली बँकिंग, डोअर स्टेप बँकिंग, मेंढी, गाढवे खरेदीसाठी कर्ज अशा नवनवीन संकल्पना आणि ही बँक ग्रामीण महिलांची आज आधार बनली आहे. माणदेशी चेंबर ऑफ कॉमर्स, माणदेशी फाउंडेशन, व्यसनमुक्ती उद्योगिनी प्रशिक्षण असे नवनवीन उपक्रम राबवत यांनी अक्षरशः हजारो माणदेशी महिलांना सक्षम केले आहे. कुटुंबे संपन्न व समृद्ध केली आहेत.

1991 पासून प्रतिवर्षी अर्थ, कला, विज्ञान, साहित्य, अध्यात्म, सामाजिक कार्य अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्र अगर त्या कार्यक्षेत्रात राहून कार्य करणाऱ्या व्यक्तीस सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. पुरस्काराचे हे 31 वे वर्ष असून, यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. शिवाजीराव भोसले, ह .भ .प .बाबा महाराज सातारकर ,शाहीर साबळे, निळकंठराव कल्याणी, डॉ. रणजीत जगताप, डॉ. नरेंद्र दाभोळकर, धावपटू ललिता बाबर, गिरीश कुबेर, ह. भ. प. चारुदत्त बुवा आफळे आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.