औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात गुंडगिरीच्या घटना सुरूच आहे. उद्योगनगरी वाळूज महानगर परिसरात कंपनी चालकावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता, कंपनी गेटसमोर थांबू नका, असं सांगितल्याच्या रागातून टोळक्याने कंपनीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज एमआयडीसी परिसरातील आकार टूल्स या कंपनीची तोडफोड करण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी कि, मध्यरात्री काही तरुण कंपनीच्या गेट समोर वाद घालत होते. त्यावेळी सुरक्षारक्षकाने गेटसमोर थांबू नका, असं सांगितल्याच्या रागातून या टोळक्याने चक्क कंपनी परिसरात तोडफोड केली. आकार टूल्स कंपनीच्या केबिनची टोळक्याने तोडफोड केल्याचे समोर आले आहे. तोडफोड करणाऱ्या सहा ते सात जणांवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, उद्योग जगतावर वारंवार हल्ले होत असल्याने उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना समोर येत आहे. त्याचबरोबर शहर व जिल्ह्यात रोज विविध गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा अबाधित आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.