व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

गणेशोत्सवाची दणक्यात तयारी! लालबागच्या राजाचा केला तब्बल 26 करोड रुपयांचा विमा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेश उत्सवानिमित्त संपूर्ण देशात जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक ठिकाणी गणपतीची मंडळे, गणपतीच्या मोठ्या मुर्त्या उभारल्या जात आहेत. परंतु या सगळ्या चर्चेत आहे ती म्हणजे फक्त लालबागच्या राजाची मूर्ती. दरवर्षी लालबागच्या राजाला पाहण्यासाठी लोक लांबून येत असतात. लालबागचा राजाने घातलेली आभूषणे, त्याची मूर्ती, त्याचा साज, त्याची उभारण्यात आलेली आरास पाहण्यासाठी फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातून देखील लोक येत असतात. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, यावर्षी लालबागचा राजा एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आला आहे. तो म्हणजे त्याच्या करण्यात आलेल्या विम्यामुळे.

26 करोड रुपयांचा विमा

होय, यावर्षी लालबागच्या राजाचा विमा करण्यात आला आहे. लालबागचा राजा गणेश मंडळाने यावर्षी 26.5 करोड रुपयांचा विमा केला आहे. दिवसेंदिवस लालबागच्या राजाची प्रसिद्धी वाढत चाललेली आहे. लालबागचा राजाला पाहण्यासाठी लोक खूप लांबून येत असतात त्यामुळे मंडळात गर्दी जमा होते. या दरम्यान काही अघटित घटना घडू नये, आणि ती घडली तरी त्यावर उपाययोजना तयार असाव्यात यासाठी मंडळाने कर्मचारी, स्वयंसेवक, स्थानिक निवासी, गणेशभक्त, बोर्ड ट्रस्ट या सर्वांचा विमा केला आहे. लालबागचा राजाच्या मंडळात काही दुर्घटना घडली तर विमा लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांची मदत केली जाईल.

लालबाग राजाच्या आभूषणांवर 7 करोडचा विमा

यासोबत गणेश मंडळाने, लालबागच्या आभूषणांवर आणि किमती सामानांचा देखील विमा केला आहे. आभूषणे आणि किमती सामान मिळून तब्बल 7 करोड 4 हजार रुपयांचा विमा करण्यात आला आहे. तसेच, विजेच्या उपकरणातून मंडळात झालेल्या नुकसानीसाठी 2.5 करोड रुपयांचा विमा करण्यात आला आहे. त्याचबरोबर लालबाग राजाच्या मंडळाच्या परिसरात दुर्घटना झाल्यास 12 करोड रुपयांचा विमा करण्यात आला आहे. असे मिळून गणेश मंडळाने तब्बल 26 करोड रुपयांचा विमा यावर्षी केला आहे. या कारणामुळेच यावर्षी लालबागचा राजा जास्त चर्चेत आला आहे.