अनैतिक संबंधाच्या संशयावरून टोळक्याने तरुणाला भर रस्त्यावर भोसकले

औरंगाबाद – नातेवाईक महिलेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून टोळक्याने तरुणाला भररस्त्यावर भोसकल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री बाबा पेट्रोल पंप ते कार्तिक चौक या व्हीआयपी रस्त्यावर घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे त्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम दीपक बागुल असे 25 वर्षीय जखमी तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शुभम हा फर्निचर चे काम करतो. काम करण्यासाठी काही दिवसांपूर्वी तो धुळे येथे गेला होता. तेथे एका विवाहित महिलेसोबत तो बोलायचा मात्र त्याच्या नातलगांना दोघांमध्ये काही अनुचित प्रकार असल्याचा संशय होता. तेथील काम आटोपल्यानंतर तो औरंगाबादेत आला, मात्र नातेवाईकांच्या मनात दोघांच्या संबंधाविषयी चीड होती. शनिवारी रात्री धुळे येथील पाच ते सहा जण औरंगाबादेत आले. बालाजीनगर येथून बोलायचे असल्याची थाप मारत एका तरुणाने शुभमला घरा बाहेर आणले व ते व्हीआयपी रस्त्यालगत बोलत उभे असताना त्याचे पाच ते सहा साथीदार तेथे आले व काही कळण्याच्या आतच त्यांनी शुभम वर हल्ला चढवला व धारदार चाकूने छातीवर, पोटावर, अंगावर वार केले या हल्ल्यात शुभम गंभीररीत्या जखमी झाला यानंतर सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला.

शुभमवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस त्याचा जाब जबाब नोंदवत होते. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.