सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात अत्यंत हृद्यद्रावक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन पोटच्या मुलानेच धारधार शस्त्राने आईचा खून केल्याची घटना घडली आहे. सुलाबाई पवार (वय – 65 वर्षे, रा. रहिमतपूर, ता कोरेगांव) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान या खुनानंतर आरोपी मुलगा शहाजी लाला पवार हा स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिकचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर येथील बसस्थानक परिसरात आज पहाटेच्या सुमारास मुलाने धारधार शस्त्राच्या साहाय्याने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सुलाबाई पवार असे मृत महिलेचे नाव होते. खून केल्यानंतर संशयित आरोपी शहाजी पवार हा स्वतः रहिमतपूर पोलीस स्टेशनला हजर झाला.
किरकोळ कारणावरून भांडणे झाल्याने स्वतः खून केल्याचे शहाजी पवार यांनी पोलिसांना सांगितले. आईचा खून केला असल्याची कबुली मुलाने दिली आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी दिली. तर अधिक तपास रहिमतपूर पोलीस अधिकारी गणेश कड करीत आहेत.