बहुप्रतिक्षित मनमाड-नांदेड विद्युतीकरणाला लवकरच होणार सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाड्यातील बहुप्रतीक्षीत अशा जालना-मनमाड आणि जालना-नांदेड या दोन लोह मार्गांच्या विद्युतीकरणाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तसेच पुढील आठवड्यात या दोन्ही कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून गेल्या काही दिवसांपासून यासाठी मंत्री दानवे यांचा पाठपुरावा सुरु आहे. अखेर या योजनेला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती त्यांनी नुकतीच दिली. केंद्र सरकारच्या वंदे भारत या रेल्वे योजनेअंतर्गत रेल्वे मराठवाड्यातूनही धावली पाहिजे, अशी मंत्री दानवे यांची महत्त्वाकांक्षा आहे. या मार्गांचे विद्युतीकरण झाल्यानंतर वंदे भारत रेल्वे मराठवाड्यातील दोन स्थानकांदरम्यान धावू शकेल. यामुळे येथील प्रवाशांची सोय होईल आणि औद्योगिक विकासास चालना मिळेल.

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्रीपदी विराजमान झाल्यावर रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यातील रेल्वे मार्गांचे जाळे अधिक सशक्त करण्यावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणली जाणारी ‘वंदे भारत’ रेल्वे आपल्या भागातूनही जावी, अशी मराठवाड्यातील जनतेची इच्छा आहे. मात्र ज्या लोहमार्गाचे विद्युतीकरण झालेले आहे, अशाच मार्गावर वंदे भारत रेल्वे धावत नाही, हे कळताच मंत्री दानवे यांनी ही रेल्वे आपल्या भागातही यावी, यासाठी पुढाकार घेतला. या प्रकल्पासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला. त्यानंतर आता जालना- मनमाड आणि जालना-नांदेड या दोन लोहमार्गांच्या विद्युतीकरणाच्या कामासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

‘वंदे भारत’ ही सेमी हायस्पीड रेल्वे आहे. अशा प्रकारची रेल्वे प्रामुख्याने दोन शहरांमध्ये दिली जाते. तसेच ताशी 130 ते 180 किमी एवढा तिचा वेग असतो. सध्या देशातील काही प्रमुख शहरांमध्येच ही रेल्वे उपलब्ध आहे. जालना ते मनमाड आणि जालना ते नांदेड या मार्गाचे विद्युतीकरण झाल्यावर येथील रेल्वेचा वेग ताशी 120 ते 130 किमी असेल. तसेच या मार्गावर नव्या रेल्वे सुरु करता येतील. यात प्रामुख्याने इंटरसिटी ट्रेनचा समावेश असेल.

Leave a Comment