मशीन लर्निंग तंत्राद्वारे विद्यार्थ्यांनी वर्तवला महाराष्ट्र लोकसभा निकालांचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | लोकसभा एग्झिट पोल

निवडणुका म्हटलं की मतदानाच्या टक्केवारीपासून ते जिंकलेल्या जागांपर्यंत अनेक प्रकारची आकडेवारी डोळ्यापुढे येते. सध्यादेखील टीव्ही आणि वर्तमानपत्रे ही एक्झिट पोलच्या आकड्यांनी भरून गेले आहेत. असाच एक आकड्यांशी खेळण्याचा प्रयत्न, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी डॉ.आकांक्षा काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मशीन लर्निंग’ हे तंत्र वापरून महाराष्ट्र लोकसभा निकालाचा अंदाज वर्तवला आहे.
एम.एस्सी. द्वितीय वर्षाच्या विनय तिवारी, आर विश्वनाथ आणि शरद कोळसे या तीन विद्यार्थ्यांनी जुन्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील निकाल आणि सर्वेक्षणातून दिसणारा सध्याचा जनमानसाचा कौल यांच्या आधारे मशिन लर्निंग तंत्रांच्या निवडणूक निकालांचे अंदाज वर्तवले आहेत.

काय आहे मशीन लर्निंग तंत्र¶

मशिन लर्निंग हे संख्याशास्त्र आणि संगणक विज्ञान यांच्या संयोगातून विकसित झालेलं शास्त्र आहे. जुन्या माहितीचा अभ्यास करुन त्यातून डेटा माइनिंग तंत्रांच्या साह्याने काही नवीन अंदाज बांधता येतात. हे अंदाज बांधण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स वापरली जातात.

विचारात घेतलेले घटक¶

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणारी मागच्या तीन लोकसभा निवडणुका आणि एका विधानसभा निवडणुकांमधील विजयी आणि पराभूत उमेदवार, त्यांना मिळालेली मते यांबद्दलची माहिती या मॉडेल्ससाठी वापरली गेली. त्याचबरोबर जनमानसाचा सध्याचा कल ओळखण्यासाठी सीएसडीएस – लोकनीती यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या सर्वेक्षण अहवालांमधून, सध्याच्या सरकारच्या कामगिरीबद्दलची लोकांची प्रतिक्रिया, पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवारांची लोकप्रियता, मागच्या निवडणुकीतील आपले मत यंदा बदलू इच्छिणारे मतदार अशा माहितीचा देखील वापर करण्यात आला.

असे आहेत महाराष्ट्राचे अंदाज¶

भाजप १७-२३
शिवसेना १६-२१
राष्ट्रवादी ३-९
कॉग्रेस १-६

अनेक मॉडेल्स वापरुन सर्वप्रथम मॉडेल्सची वैधता तपासण्यासाठी सर्वप्रथम या मॉडेल्सचा वापर करुन २००९ आणि २०१४ च्या निवडणुकांचे अंदाज वर्तवण्यात आले. हे अंदाज प्रत्यक्ष निकालांशी पडताळून पाहिले असता रॅंडम फॉरेस्ट या मॉडेलने सर्वाधिक म्हणजे ९६% उमेदवारांच्या विजय/ पराभवाबद्दल अचूक अंदाज वर्तवले. विशेषतः २०१४ च्या निवडणुकांमधील इतर अनेक एक्झिट पोलच्या निकालांपेक्षा हे निकाल अधिक अचूक असल्याचे दिसून आले. रॅंडम फॉरेस्ट मॉडेल हे अनेक डिसिजन ट्री वापरून बनते. डिसिजन ट्री हे मॉडेल एक-एक करत उमेदवाराशी संबंधित वेगवेगळे घटक (उदा. मागील निवडणुकीत त्या उमेदवाराच्या पक्षाला मिळालेली मते) विचारात घेऊन प्रत्येक उमेदवाराची जिंकण्याची शक्यता /संभाव्यता देते. यावरून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

प्रकल्प मार्गदर्शिका :डॉ. आकांक्षा काशीकर यांची प्रतिक्रिया¶

“निवडणुकांच्या या संख्याशास्त्रीय अभ्यासामुळे भारतीय लोकशाहीचे अनेक नवीन पैलू विद्यार्थ्यांना अभ्यासण्यास मिळाले. वर्गात शिकलेल्या तंत्रांचा अशाप्रकारे प्रत्यक्ष वापर करण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्याशास्त्रीय ज्ञानातही निश्चितच भर पडली. प्रत्यक्ष निकाल २३ तारखेला येतीलच. परंतु, संख्याशास्त्रातील तंत्रांच्या आधारे इतर एक्झिट पोलच्या निकालांच्या जवळपास आम्ही पोचू शकलो, याचे समाधान आहे.”

Leave a Comment