शुल्क भरलं नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावला; यानंतर विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील पाळा येथील वसुधाताई देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात बी टेकच्या अंतिम वर्षाला अनिकेत निरगुडवार हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. मूळच्या यवतमाळ जिल्ह्यातील अनिकेत निरगुडवार या विद्यार्थ्यांने रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या मुलाने महाविद्यालयाची फी भरली नाही म्हणून महाविद्यालयाने आपल्या मुलाच्या हातातील पेपर हिसकावून घेतला. त्यामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप अनिकेतचे वडील अशोक निरगुडवार यांनी केला आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या आत्महत्ये संदर्भात बडनेरा पोलिसांत तक्रार दाखल करून योग्य चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

महाविद्यालयाने आरोप फेटाळले
अनिकेत निरगुडवार या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर महाविद्यालयाने आपली बाजू मांडत विद्यार्थ्यांच्या पालकाने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याचा पेपर हिसकावला नसून त्याने पेपर दिला असल्याचं महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वैशाली देशमुख यांनी सांगितले आहे. महाविद्यालय प्रशासनावर कडक कारवाई करावी अशी मागणी मृत अनिकेत निरगूडवार याच्या कुटुंबीयांनी केली आहे.

अनिकेतचे स्वप्न अपुरेच राहिले
अनिकेत हा शेतकरी कुटुंबातील मुलगा होता. गेल्या तीन वर्षांपासून बडनेरा येथे शिकतो. तिथं तो भाड्याने रूम करून राहतो. कृषी अधिकारी बनायचं त्याचं स्वप्न होतं. मात्र त्याच्या या आत्महत्येनंतर ते स्वप्न अपुरेच राहिले आहे. आपला भविष्यातला आधार निघून गेल्याने अनिकेतच्या वडिलांना आपले अश्रू अनावर झाले होते. काँग्रेसचे माजी मंत्री व माजी पालकमंत्री वसुधा देशमुख यांच्या संस्थेमध्ये हि दुर्दैवी घटना घडली आहे.

Leave a Comment