वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श होऊन ट्रकला लागली भीषण आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या आपटा पोलीस चौकीजवळ एका पाईपने भरलेल्या आयशर ट्रकला भीषण आग लागली. वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मनपाच्या अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत बर्निंग आयशरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

संजयनगर परिसरात राहणारे चालक ऋषिकेश सुतार हे त्यांच्या जवळील आयशर ट्रक घेऊन स्वरूप टॉकी ते आपटा पोलीस चौकीकडे निघाले होते. सांगली शहरात गॅसच्या पाईपलाईनचे ठिकठिकाणी काम सुरु आहे. यासाठी लागणाऱ्या पाईप घेऊन सदरचा ट्रक निघाला होता. आपटा पोलीस चौकी जवळ असणाऱ्या महापालिकेच्या आरसीएच कार्यालयाजवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदरचा ट्रक आला असता वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श या पाईपला झाला.

सदरच्या पाईपला प्लास्टिक इन्सुलिंग कोटींग असल्याने ठिणग्या पडून पाईपला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. काही क्षणातच आग वाढल्यामुळे नागरिकांची धावपळ सुरु झाली. याची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला नागरिकांनी दिली. दोन बंब आणि सहा जवानांच्या मदतीने धाव घेत या बर्निंग टेम्पोच्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविले.

Leave a Comment